महाराष्ट्र राज्याची प्रतीके
राज्य फूल : ताम्हण
शास्त्रीय नाव: लॅगस्ट्रोमिया रेजिनी
कडक उन्हाळ्या रंगाच्या फुलांनी फुललेले हे वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेतात. हे झाड साधारण गोलसर, डेरेदार असते. याचे फूल पूर्ण उमलल्यानंतर सहा ते सात सेंटिमीटर व्यासाचे होते. त्या फुलाला झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, सलम, गुणीदार पाकळ्या असतात. कोकणात नदी-नाल्यांच्या काठांवर, बंगाल, आसाम, दक्षिण भारत, अंदमान, निकोबार आणि श्रीलंका येथील जंगलात तसेच म्यानमार, मलाया, चीन या देशांत नदीकाठी आणि दलदलीच्या भागात ही झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे झाड सरासरी दहा ते वीस मीटर उंचीचे असते. भारतात त्याचा वापर शोभेसाठी केला जातो. रायगड जिल्ह्यात माणगाव येथे जारुळाचा अंदाजे शंभर फूट उंचीचा वृक्ष आहे. लाकूड लालसर रंगाचे, मजबूत, टिकाऊ, चमकदार असते. टिकाऊपणा आणि उपयोग या बाबतीत जारूळ हा वृक्ष सागवानाच्या झाडाशी स्पर्धा करतो, हे लाकूड इमारती, होड्या, घरबांधणी, पूल, मोटारी, जहाज बांधणी, रेल्वे वॅगन अशा विविध कामांत आणि विविध वस्तू बनविण्यासाठी वापरले जाते.
हा वृक्ष भरपूर पाणी मिळणाऱ्या जागी वाढतो. हे झाड एप्रिल ते जूनच्या दरम्यान फुलून येते. त्याचे शास्त्रीय नाव 'लॅगस्ट्रोमिया रेजिनी' असे आहे. हा सपुष्प वृक्ष लिथ्रेसी किंवा मेंदी कुळातील आहे. त्याला जारूळ, तामण, बोंडारा, बांद्रा, बुंद्रा अशी इतर नावेही आहेत. भारतीय उपखंडातील जंगली फूल म्हणून याची ओळख असली तरी त्याच्या गुणांमुळे ते फूल युरोप-अमेरिकेतही पोहोचले आहे. ताप आला असल्यास या झाडाच्या सालीचा काढा दिला जातो तसेच तोंड आले असल्यास याचे फळ तोंडाला आतून लावले जाते. ताम्हणाच्या पानांत फळांत 'हायपोग्लिसेमिक' हे द्रव्य असते. ते मधुमेहावर गुणकारी आहे. पोटदुखीवरील इलाज आणि वजन कमी करण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जातो. याच्या फुलास शासनाने राज्य पुष्पाचा दर्जा दिला आहे. देशातील वनस्पती शास्त्राच्या अभ्यासकांनी जारूळाचे 'प्राईड ऑफ इंडिया' असे सार्थ नामकरण केले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत या वृक्षाला आकर्षक फुले येत असल्याने ते सर्वांचे लक्ष वेधून घेते.
राज्य प्राणी : शेकरू
शास्त्रीय नाव: रटूफा इंडिका
मोठी खार म्हणून ओळख, महाराष्ट्रात सह्याद्रिच्या रांगेत दाट जंगलात प्रामुख्याने भीमाशंकर, फणसाड, अंबाघाट जंगल तसेच मेळघाट अभयारण्य, ताडोबा राष्ट्रीय उद्यान येथे अधिवास, वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. डोळे गुंजेसारखे लालभडक, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा आणि शेपूट झुबकेदार लांबलचक असते. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज झेप घेणारा शेकरू १५ ते २० फूट लांब उडी मारू शकतो. डहाळ्या व पाने वापरून बनविलेले शेकरूचे घरटे गोलाकार असते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांदयांवर बांधले जाते, जेथे अवजड परभक्षी पोहोचू शकत नाहीत. एक शेकरू सहा ते आठ घरे तयार करतो. शेकरूची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एखादया घरट्यातच शेकरूची मादी पिले देते. इतर फसल्या घरट्यामुळे पिल्लांचे शत्रूपासून रक्षण होते, शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मीळ होत चाललेल्या प्रजातीतील प्राणी आहे.
राज्य पक्षी - हरियाल
शास्त्रीय नाव: ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा
हा पक्षी महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाब व आसाम येथील अभयारण्यांत दिसून येतो. तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका येथेही हरियाल सापडतो. हा कबूतरवंशीय पक्षी आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची होळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षीही दुर्मीळ झाला आहे. पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियालच्या अंगावर असतात. हरियाल हा कबूतरासारखाच घुमतो. कधीकधी चिरं... चिरं... आवाज करीत फिरतो. नर आणि मादी हरियाल यांच्यात बाह्यतः फरक दिसत नाही. गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर आवळतात. हे पक्षी नेहमी थव्यानेच उडतात. विणीचा हंगाम मार्च ते जून या कालावधीत असतो. या काळात उंच झाडावर काड्यांनी हे पक्षी अंडी घालतात.
राज्य फळ आंबा
शास्त्रीय नाव: मॅजिफेरा इंडिका
आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे ज्ञात नाही, परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये आंब्याचा उगम झाला असावा असे मानण्यात येते. हा विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारा वृक्ष आहे. अवीट गोडीच्या याच्या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा हंगाम असतो. कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही चवीला आंबट असते, आंबट नसलेल्या कॅरीला खोबरी करी असे नाव आहे. आंबा फळांचा राजा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने अनेक धार्मिक कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आल्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे बाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्र प्रदेशातील बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशातील दशेरी, लंगडा, दक्षिणेतील नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकुयीची सिंधू ही जात विकसित केली आहे.
राज्य फुलपाखरू
ब्लू मॉरमॉन
शास्त्रीय नाव: पॅपिलिये पॉलिम्नेस्टर
भारतातील महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून याचे नाव घोषित झाले आहे. २२ जून, २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू श्रीलंका व भारतातील महाराष्ट्र, दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सध्या विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत त्याचे अस्तित्व आहे. ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू भारतातील आकाराने सर्वांत मोठ्या असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतरचे सर्वांत मोठे फुलपाखरू असून ते मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. पंखाखालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो. महाराष्ट्रात फुलपाखरांच्या जवळपास २२५ प्रजाती आहेत. देशातील १५ टक्के फुलपाखरे महाराष्ट्रात आढळतात.
छान माहिती आहे
उत्तर द्याहटवा