मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

संत गाडगेबाबा



            

          *संत गाडगे महाराज*


      *डेबूजी झिंगराजी जानोरकर*

             (समाज सुधारक)


     *जन्म : 23 फेब्रुवारी 1876*

 (शेणगाव,महाराष्ट्र , ब्रिटिश भारत)


    *निधन : 20 डिसेंबर 1956* 

                (वय 80)

  ( वलगाव, अमरावती , महाराष्ट्र )


मुख्य स्वारस्ये : धर्म , कीर्तन ,    

                      नीतिशास्त्र

प्रभाव : डाॕ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील , भाऊराव कृष्णाजी गायकवाड , तुकडोजी महाराज आणि मेहेर बाबा

                     गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

                 संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

         गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

                    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.

 

👬 *गाडगेबाबा आणि बाबासाहेबांची भेट*

                         14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.

गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."

डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

 *गाडगे महाराजांची चरित्रे*

  असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)

कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)

गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)

गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)

श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)

Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)

गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)

गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)

गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)

निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)

लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)

The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)

संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)

संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)

संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)

संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)

श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)

श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)

संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)

गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)

समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )

स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)

🎥 *गाडगेबाबांच्या जीवनावरील चित्रपट*

                डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर

देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त


📖 *साहित्य संमेलन*

               महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.

 *मृत्यू*

                       गाडगे महाराजांचे अमरावती जवळ पेढी नदीच्या काठावर, वडगाव जि. अमरावती 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. 


🏵 *सन्मान* 

                       त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रकल्प २०००-०१ मध्ये सुरू केला. हा कार्यक्रम स्वच्छ गावे सांभाळणार्‍या ग्रामस्थांना बक्षिसे देतो. याव्यतिरिक्त, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता व पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली. त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.

 *सन्मान*

            भारताच्या टपाल खात्याने त्यांच्या नावावर स्मारक शिक्के जारी करुन गाडगे महाराजांचा गौरव केला होता.


 🙏🌹 *गोपाला... गोपाला... देवकीनंदन गोपाला...* 🌹🙏

        

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट