भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक आयकॉन आणि जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
उस्ताद झाकीर हुसेन हे महान तबला वादकांपैकी एक मानले जातात. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन गौरविले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. हुसेन यांच्या निधनाने संगीत जगत शोकाकुल झाले आहे.
झाकीर हुसेन यांनी अनेक प्रशंसित भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी संगीत दिले आणि सादरीकरण केले आहे. त्यांचे अपवादात्मक तबला कौशल्य जगप्रसिद्ध होते. सुमारे चार दशकांपूर्वी ते त्याच्या कुटुंबासह सॅन फ्रान्सिस्को येथे स्थलांतरित झाले. तिथे त्यांनी जागतिक संगीत विश्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या अवलिया तबलावादकाला त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. त्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीरचे वडील अल्ला राख हेही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले.
वयाच्या 11व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट
झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' लाँच केला. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बोटांमध्ये जादू आहे असे त्यांचे चाहते म्हणतात. त्यांनी तबल्यावरून बोटं फिरवली की जादुई सूर वाजत आणि चाहते त्या सुरांमध्ये मंत्रमुग्ध होत. झाकीर हुसेन यांनी सुरुवातीच्या काळात पैशाअभावी जनरल कोचमधून प्रवास केला. त्यांना रेल्वेत जागा मिळाली नाही तर ते वर्तमानपत्र पसरवून झोपायचे. परंतु तबल्याला कोणाचाही पाय लागू नये म्हणून ते तो मांडीवर घेऊन झोपायचे.
तबला वादनातून पहिली कमाई 5 रुपये
झाकीर हुसेन यांना वयाच्या 12 व्या वर्षी त्यांना एका मैफिलीत तबला वादनातून 5 रुपये मिळाले, ही त्यांची सर्वात पहिली आणि अतिशय मौल्यवान कमाई आहे असे ते सांगत. या मैफिलीत पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्ला खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज या संगीत दिग्गजांनीही हजेरी लावली होती. झाकीर हुसेन वडिलांसोबत स्टेजवर गेले आणि त्यांनी परफॉर्म केले. त्यांचा परफॉर्मन्स संपल्यानंतर त्यांना 5 रुपये मिळाले. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की मी माझ्या आयुष्यात खूप पैसे कमावले, पण ते 5 रुपये सर्वात मौल्यवान होते.
व्हाईट हाऊसमध्ये केले फरफॉर्म
उस्ताद झाकीर हुसेन यांनी आयुष्याच्या शेवटच्या दिवसातही अनेक मैफिली गाजवल्या. देश-विदेशात त्यांनी अनेक कार्यक्रम केले. अमेरिकेनेही झाकीर हुसेन यांचा सन्मान केला होता. 2016 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार होते ज्यांना हे आमंत्रण मिळाले होते.
चित्रपटातही केले काम?
शशी कपूरसोबत हॉलिवूड सिनेमात काम करणाऱ्या झाकीर हुसेन यांनी काही सिनेमांमध्येही काम केले आहे. 1983 मध्ये आलेल्या 'हीट अँड डस्ट' या ब्रिटिश चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केले. शशी कपूर यांनीही या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर 1998 साली आलेल्या 'साज' चित्रपटातही त्यांनी काम केले होते. या चित्रपटात त्यांच्या विरुद्ध शबाना आझमी होत्या. या चित्रपटात झाकीर हुसैन यांनी शबानाच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. मुघल-ए-आझम (1960) या चित्रपटात झाकीर हुसैन यांना सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना परवानगी दिली नाही. आपल्या मुलाने फक्त संगीतावर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏