*जन्म : 22 सप्टेंबर 1923*
(वर्धा, ब्रिटिश भारत)
*निधन : 21 सप्टेंबर 1994 (वय 70)*
(मुंबई, भारत)
संस्था : बजाज गृप
चळवळ : चले जाव चळवळ
वडील - जमनालाल बजाज
आई - जानकीदेवी बजाज
जन्म.२२ सप्टेंबर १९२३ वर्धा येथे.
एका बाजूला व्यवसाय चालवण्याचे व वाढवण्याचे व्यवधान, दुसऱ्या बाजूला भारतीय तत्वज्ञान व पुराणे यांचा अभ्यास आणि त्याबरोबर महात्मा गांधींच्या चळवळींत सक्रिय सहभाग ही कसरत लीलया सांभाळण्याची दिव्य कसरत ज्यांना जमली, त्यातलेच एक रामकृष्ण बजाज! बजाज कुटुंबाने उद्योगांचे साम्राज्य उभारतानाच देशसेवेचे व्रतही सांभाळले.
जमनालाल बजाज यांनी महात्मा गांधींबरोबर राहून त्यांची सदैव सेवा केली. गांधीजी त्यांना आपला मुलगाच मानत. त्यांच्या पुढच्या पिढीतले रामकृष्ण बजाज. रामकृष्ण बजाज हे जमनालाल व जानकीदेवी यांचे द्वितीय पुत्र आणि कमलनयन बजाजांचे धाकटे बंधू होत.
रामकृष्ण बजाज यांचे शिक्षण वर्धा येथील नवभारत विद्यालयात चालू असतानाच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याकरिता त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांनी १९४०-४५ यांदरम्यान तीन वेळा कारावास भोगला. त्यांचे थोरले बंधू कमलनयन यांच्या निधनानंतर बजाज उद्योग समुहाची सूत्रे रामकृष्णजींकडे आली. बजाज उद्योगाचा विकास करतानाच त्यांनी बजाज फाऊंडेशनमार्फत जनसेवा चालूच ठेवली.
ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागांत आरोग्य व शिक्षण सुविधा पोहोचण्यावर त्यांनी भर दिला. पुढे हे कार्य राहुल बजाज यांनी पुढे चालू ठेवले. रामकृष्ण बजाज हे १९७२-७६ दरम्यान विदर्भ विकास निगमाचे अध्यक्ष होते. ‘कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस’ या संस्थेच्या प्रमुख संस्थापकांपैकी रामकृष्ण हे एक असून या संस्थेने व्यापार व्यावसायिकांसाठी एक आचारसंहिता तयार केली होती.
रामकृष्ण बजाज यांच्या मते गैरव्यवहार करणाऱ्या काही व्यापाऱ्यांमुळे संबंध व्यापारी वर्गाची बदनामी होऊ नये म्हणून ही आचारसंहिता कार्यवाहित आणली जाणे अत्यावश्यक होती. यांशिवाय त्यांनी बच्छराज अँड कंपनी लि. हिंदुस्तान शुगर मिल्स लि. मॅचवेल इलेक्ट्रिकल्स इंडिया लि. हर्क्युलस हॉइस्ट्स लि. वगैरे कंपन्यांचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. मुकंद आयर्न अँड स्टील लि. चे ते उपाध्यक्ष होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (१९६४-६८), कौन्सिल फॉर फेअर बिझिनेस प्रॅक्टिसेस (१९६९-७१), नॅशनल कमिटी ऑफ इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (१९७८-७९), इंडियन मर्चट्स चेंबर (१९७९-८०) इ. नामवंत संस्थांचे ते अध्यक्ष होते. तसेच त्यांनी‘बजाज इंटरनॅशनल प्रा.लि.’ मुंबई, या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतात.
रामकृष्ण बजाज यांनी जापान की सैर, रूसी युवकोंके बीच, अटलांटिक के उसपास ही हिंदी तर द यंग रशिया व सोशल रोल ऑफ बिझिनेस ही इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत.
रामकृष्ण बजाज यांचे २१ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏