!! राष्ट्रीय क्रीडा दिन !! (२९ ऑगस्ट )
२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून २००२ पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
आजच्याच दिवशी १९०५ रोजी उत्तरप्रदेश मधील अलाहाबाद येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील सोमेश्वर दत्त सिंग हे आर्मी मध्ये असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. वडिलांच्या निवृत्तीनंतर १९२२ साली वयाच्या १६ व्या वर्षी ते स्वतः आर्मीत दाखल झाले. त्यावेळी ते आर्मीच्या रेजिमेंटमध्ये होणाऱ्या हॉकी सामन्यात खेळताना त्यांचे हॉकीतील कौशल्य पाहून मेजर बाले तिवारी यांनी त्यांना हॉकीमधील बारकावे शिकवले. ते त्यांचे हॉकीमधील गुरु होते. पुढे मेजर ध्यानचंद हे हॉकीमध्ये इतके रमले की हॉकी म्हणजे त्यांचा जीव की प्राण ठरला. १९२२ ते १९२६ या कालावधीत त्यांनी रेजिमेंटच्या विविध स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवले. हॉकीतील त्यांच्या कर्तृत्वामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या इंडियन आर्मीच्या संघात त्यांची निवड झाली हा दौरा त्यांनी गाजवला. या दौऱ्यात त्यांनी आपल्या संघाला १८ विजय मिळवून दिले, दोन लढती बरोबरीत सुटल्या तर फक्त एका लढतीत पराभव स्वीकारला. हा दौरा त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. या दौऱ्याने त्यांना जगभर नाव मिळवून दिले. या दौऱ्यानंतर त्यांना लान्स नायक म्हणून बढती मिळाली.
केवळ भारतच नाही तर जगातील अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या खेळाच्या प्रेमात पडले. ध्यानचंद यांचे हॉकी खेळण्याचे कौशल्य अफलातून होते. चेंडूवरची नियंत्रण ही त्यांची खासियत होती. चेंडू त्यांच्या ताब्यात असताना, मैदानावर कोणी खेळत नाही असेच वाटायचे. चेंडू त्यांच्या स्टिक जवळून हलतच नसे म्हणून त्यांच्या स्टिक मध्ये चुंबक बसवला आहे अशी अफवा तेंव्हा पसरली होती.
हॉकी हा सांघिक खेळ आहे तो संघ भावनेनेच खेळला पाहिजे असे त्यांचे मत होते म्हणूनच चेंडूवर अफलातून नियंत्रण असूनही ते आपल्या सहकाऱ्यांना अचूक पास द्यायचे. हॉकीतील त्यांच्या या कौशल्यामुळेच त्यांना हॉकीतील जादुगार असे म्हटले जायचे. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या जादुई खेळाने देशाला १९२८ (अँमस्टरडॅम) १९३२( लॉस अँजेलीस ) आणि १९३६ (बर्लिन) अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॉकीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. १९३६ मधील भारत जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत ध्यानचंद यांच्या हॉकीतील कौशल्याने जर्मनीचा हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलर यांनाही वेड लावले होते. त्यांच्या या असामान्य कौशल्याने भारावलेल्या हिटलर यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ऑफर दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती.
लॉस अँजेलीसमध्ये खेळलेल्या भारतीय संघाचे वर्णन एका अमेरिकन पत्रकाराने पूर्वेकडील वादळ असे केले होते. ध्यानचंद १९५६ मध्ये निवृत्त झाले त्याचवर्षी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरवले. निवृत्तीनंतर पटियाला येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी तरुण खेळाडूंना प्रशिक्षण दिले. भारताला सुवर्णयुगाची अनुभूती देणाऱ्या या महान हॉकीच्या जादूगाराला मरणोत्तर भारतरत्न गौरवाने सन्मानित करावे अशीच तमाम भारतीय क्रीडा रसिकांची इच्छा आहे.
मेजर ध्यानचंद यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏