blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्वातंत्र्यसेनानी मादाम भिकाईजी रुस्तम कामा

                                        


          *स्वातंत्र्यसेनानी मादाम भिकाईजी रुस्तम कामा* 


    *जन्म : २४ सप्टेंबर १८६१*

              (मुंबई, ब्रिटिश भारत)


     *मृत्यू : १३ ऑगस्ट १९३६*

               (मुंबई, ब्रिटिश भारत) 


या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या.

मादाम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर, इ.स. १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तम कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.

🔮 *कार्य*

दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्‍न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्या विशेषेकरून देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत. सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी कामांनी त्यांनी मदत केली. स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणार्‍या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची मदत त्या करत. इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन लोकांना भारताबद्दल माहिती दिली.


जर्मनीत श्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, पिवळा व लाल रंगांचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते. दिनांक २२ ऑगस्ट, इ.स. १९०७ रोजी श्टुटगार्टड येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा झेंडा सर्वप्रथम फडकावतेवेळी मादाम कामा म्हणाल्या होत्या -

माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरून फडकवीत आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणार्‍या या परिषदेतील सदस्यांना स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा हा तिरंगा आव्हान देत येथे फडकत आहे. या ध्वजाला प्रणाम करा.

⏳ *अखेरचे दिवस*

मादाम कामांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण इ.स. १९३५ सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. १९ ऑगस्ट, इ.स. १९३६ या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

🚸  *मादाम कामा मार्ग*

मुंबईतील ओव्हल मैदानाजवळच्या एका हमरस्त्याला ‘मादाम कामा’ यांचे नाव दिले आहे.

🇮🇳 *मादाम कामा आणि त्यांचा राष्ट्रध्वज*

मादाम कामा यांनी शंभर वर्षापूर्वी ‘स्वतंत्र’ भारताचा ध्वज एका आंतरराष्ट्रीय मेळाव्यात फडकवला. त्यामुळे त्या काळातील वृत्तपत्रातून ही खळबळजनक बातमी जगभर पसरली. या साहसी कामगिरीसाठी त्यांचे नांव भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासात ठळक अक्षरांनी लिहिले गेले आहेच. त्यांनी तर आपले पूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून घेतले होते. कदाचित या गोष्टीला योग्य तितकी प्रसिद्धी मिळाली नसेल. त्यांनी जी इतर कामे केली त्यातली बरीचशी त्या काळात लपून छपून गुप्तपणे केलेली होती. त्यातली कांही अखेरपर्यंत गुलदस्त्यातच राहिली असण्याचीही शक्यता आहे. अशी कोणकोणती कामे त्यांनी केली ते थोडक्यात पाहू.


त्यांचा जन्म मुंबईतल्या एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नांव भिकाजी सोराबजी पटेल असे होते. ‘भिकाजी’ हे मुलीचे नांव आपल्याला ऐकायला विचित्र वाटेल, पण त्या काळात म्हणजे १८६१ साली त्यांना ते नांव ठेवले गेले होते. त्यांच्या आयुष्यात कधीही भीक मागण्याचा प्रसंग त्यांच्यावर येण्याचा प्रश्नच नव्हता. गडगंज संपत्ती घरात असलेल्या इतर तत्कालीन मुलींप्रमाणे दागदागीने, पोषाख, बंगले, बगीचे, कुत्री, मांजरे वगैरे षौक करून ऐषोआरामात लोळत राहणे त्यांनाही शक्य होते. पण या अत्यंत बुद्धीमान व संवेदनाशील मुलीवर तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचा खोलवर प्रभाव पडत होता आणि तिला देशभक्तीची ओढ आकर्षित करीत होती. इंग्रजांच्या राज्यात त्यांची अवकृपा ओढवून घेण्याचा धोका पत्करणे तिच्या वडिलांना शक्य नव्हते. तो टाळण्याच्या दृष्टीने त्यांनी रुस्तम कामा या उमद्या, देखण्या आणि श्रीमंत वकीलाबरोबर आपल्या मुलीचे लग्न लावून दिले.


संसाराला लागल्यावर भिकाजीचे लक्ष घरात गुंतून जाईल आणि त्या देशसेवेच्या ‘धोकादायक’ कार्यापासून दूर राहतील अशी सर्वांची अपेक्षा असणार. पण तसे झाले नाही. त्यात रुस्तम हा इंग्रजांचा कट्टर भोक्ता असल्यामुळे त्या पतिपत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. त्यांचा चारचौघासारखा ‘सुखी संसार’ होऊ शकला नाही. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे” हे वाक्य लोकमान्य टिळकांनी अजून उच्चारलेले नव्हते. स्वातंत्र्याचा लढा असा सुरू व्हायचा होता. त्या काळात देशासाठी जी कांही सौम्य आंदोलने होत होती, भिकाजी यांनी त्या आंदोलनांमध्ये आणि समाजसेवेच्या कार्यात भाग घेणे त्यांच्या पतीच्या विरोधाला न जुमानता सुरूच ठेवले. त्यात प्लेगच्या साथीने मुंबईला पछाडले. तेंव्हा आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. रोग्यांची शुश्रुषा करणे, त्यांना धीर देणे वगैरे करतांनाच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. पण अखेर ज्याची भीती होती तेच झाले आणि भिकाजीलाच प्लेगचा संसर्ग झाला.


त्या आजारातून त्या जेमतेम बचावल्या ख-या, पण त्या रोगाने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. इथेच राहिल्या तर तब्येतीला न जुमानता त्या पुन्हा कामाला लागतील या भीतीने त्यांच्या परिवारातील लोकांनी त्यांना हवापालटासाठी युरोपमध्ये पाठवून दिले. तिथल्या हवेत त्यांची तब्येत सुधारली. त्या अवधीमध्ये त्यावेळी इंग्लंडमध्ये रहात असलेल्या दादाभाई नौरोजी यांच्या संपर्कात त्या आल्या. भारतीयांचे  पितामह (ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया) समजले जाणारे दादाभाई त्या काळात इंग्लंडमध्येच राहून भारतवासीयांच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा देत होते. भिकाजीं त्यांचे सचिव म्हणून काम करू लागल्या. चाळिशीला पोचलेल्या भिकाजी आता ‘मॅडम कामा’ झाल्या होत्या. त्या काळात उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा ते निमित्य सांगून भारतीय युवक इंग्लंडला जात असत. मॅडम कामा सतत त्यांच्या संपर्कात राहून त्यांना लागेल ती मदत करीत.


स्टुटगार्ट येथील संमेलनात भाग घेऊन भारताचा झेंडा फडकवल्यानंतर त्या अमेरिकेच्या दो-यावर गेल्या. एक उत्कृष्ट वक्त्या म्हणून त्यांची ख्याती झाली होती. अमेरिकेत ठिकठिकाणी भाषणे देऊन त्यांनी आपले स्वतंत्र विचार परखडपणे मांडले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या बाजूला तेथील जनमत वळवण्याचा प्रयत्न केला. तेथून त्या इंग्लंडला परत आल्या, पण आता ब्रिटिश सरकारची नजर त्यांच्याकडे वळलेली होती. इंग्लंडमध्ये राहून काम करणे दिवसेदिवस कठीण होत गेल्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये पॅरिसला स्थलांतर केले. तेथून त्या इतर क्रांतिकारकांच्याबरोबर संपर्कात राहिल्या. फक्त भारतीयच नव्हे तर आयर्लंडसारख्या इतर देशातील क्रांतिकारकांनासुद्धा त्या मदतीचा हात देत होत्या. रशीयात ज्यांनी राज्यक्रांती घडवून आणली ते लेनिन त्यांना भेटायला आले होते.


युरोपमधल्या वास्तव्यात त्यांनी ‘वंदे मातरम्’ नांवाचे देशभक्तीपर नियतकालिक काढायला सुरुवात केली आणि कांही काळ ते नेटाने चालवले. इंग्रजांनी त्याचेवर बंदी घातलीच होती. त्यामुळे पॅरिसमधूनसुद्धा ते उघडपणे प्रकाशित करता येत नव्हते. मादाम कामा यांनी कधी बर्लिन, कधी जिनीव्हा कधी हॉलंड अशा वेगवेगळ्या जागा बदलून ते गुप्तपणे छापून घेणे सुरू ठेवले. या छापलेल्या मॅगझिनच्या प्रती भारतात चोरट्या मार्गाने पाठवणे आणि तिथे पोचल्यावर त्यांचे देशभर वितरण करणे हे त्याहून जास्त कठीण होते. तरीही तत्कालीन क्रांतीकारक त्या दृष्टीने चिकाटीने प्रयत्न करीत राहिले. मादाम कामा त्यात आघाडीवर होत्या.


हे सगळेच काम छुप्या रीतीने होत असल्यामुळे प्रत्यक्षात किती प्रती योग्य जागी पोचल्या, किती मध्येच जप्त झाल्या, त्या वाचून किती युवकांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली, त्यातून किती जणांनी सशस्त्र लढ्यात उडी घेतली आणि कांही हिंसक कृती करून दाखवली वगैरेचे संख्यात्मक मूल्यमापन करणे आज शक्य नाही. पण त्यामुळे “ब्रिटीश सरकार डळमळीत झाले, थरथर कांपू लागले” वगैरे म्हणणे जरा अतीशयोक्त होईल. कारण हजारोंच्या संख्येने भारतीय लोकच त्यांची नोकरी करण्यासाठी स्वखुषीने पुढे येत होते आणि मूठभर गो-यांच्या सहाय्याने ते आपला इथला अंमल व्यवस्थितपणे हांकत होते. क्रांतिकारकांनी टाकलेल्या ठिणग्या पडून देशात जागोजागी असंतोषाचे विस्फोट होतील आणि स्थानिक लोक ब्रिटीशांना मारून टाकतील किंवा पळवून लावतील अशी आशा प्रत्यक्षात फलद्रुप झाली नाही. थोडक्यात म्हणजे लेनिनला ज्याप्रमाणे रशीयातली झारची सत्ता उलथून टाकता आली तसे भारतात घडले नाही.


मादाम कामा यांच्या कार्याला लगेच अपेक्षेइतके यश त्या काळात मिळाले नसले तरी त्यामुळे त्यांनी घेतलेल्या कष्टांचे मोल कमी होत नाही. शंभर वर्षापूर्वीच्या काळात एक भारतीय स्त्री आपले सुखवस्तु कुटुंब व आपला देश सोडून परदेशात, किंबहुना शत्रूपक्षाच्या देशात जाऊन राहते. अत्यंत प्रतिकूल वातावरणात निर्भयपणे आपण ठरवलेले जीवितकार्य अखेरपर्यंत करत राहते. हे सगळे कल्पनातीत आहे.


बरोबर शंभर वर्षांपूर्वी ऑगस्ट १९०७ मध्ये जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरात समाजवादी लोकांचे आंतरराष्ट्रीय संमेलन भरले होते. त्या काळात युरोपात रहात असलेल्या मादाम कामा या भारतीय विदुषीने त्या संमेलनात भाग घेतला व भर सभेत हिंदुस्थानचा झेंडा फडकवून सर्व उपस्थितांनी त्याच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.  


ते ऐकल्यावर मादाम कामा यांच्याविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने थोडे आंतर्जालावर उत्खनन केले. त्यात बरीच उद्बोधक माहिती मिळाली आणि त्या ऐतिहासिक ध्वजाची दोन वेगवेगळी चित्रे सापडली. दोन्ही चित्रे तिरंगी असून त्यात तीन आडवे पट्टे आहेत. एका चित्रात सर्वात वर भगव्या रंगाच्या पट्ट्यात पिवळसर छटेमध्ये आठ कमळांच्या आकृती आहेत. मधला पट्टा पिवळ्या रंगाचा असून त्यावर ‘बंदेमातरं’ असे लिहिलेले आहे. खालच्या हिरव्या रंगाच्या पट्ट्यावर पांढ-या रंगात सूर्य व चंद्रकोर रेखाटल्या आहेत. दुस-या चित्रात सर्वात वरच्या बाजूला हिरवा पट्टा आणि खालच्या बाजूला लालभडक पट्टा आहे. हिरव्या पट्ट्यावर कमळांची आणि लाल पट्ट्यावर चंद्रसूर्यांची चित्रे असली तरी त्यांचे आकार वेगवेगळे आहेत. मधल्या पिवळ्या रंगाच्या पट्ट्यावर छापील अक्षरांत ‘वंदे मातरम्’ असे लिहिले आहे. फक्त शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राष्ट्रीय महत्वाच्या आणि स्वातंत्र्यसंग्रामासारख्या विषयाशी जोडल्या गेलेल्या या घटनेच्या तपशीलात इतके अंतर असावे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. यातील कोठल्या चित्रावर विश्वास ठेवायचा? त्यातील किमान एक चित्र तरी चुकीचे असणार. मग त्याच्यासोबत दिलेल्या मजकुराच्या विश्वासार्हतेचे काय?


मादाम कामा यांनी हा ध्वज स्व.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मदतीने हा ध्वज बनवला असाही उल्लेख आहे. या दोन महान देशभक्तांनी जी रंगसंगती साधली असेल ती त्या काळातील परिस्थितीमध्ये उत्कृष्टच असणार यात मला शंका नाही. त्यात काय बरोबर आहे किंवा नाही हा मुद्दाच नाही. त्यांनी यापेक्षा वेगळे रंग वापरले असते तरीही तो झेंडा वंदनीयच ठरला असता. एका आंतरराष्ट्रीय मंचावर तो फडकवण्यात मादाम कामा यांनी औचित्य, चातुर्य आणि अतुलनीय धैर्य या सर्वांचा सुरेख संगम साधला होता. भारतात सुरू असलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाला त्यातून एकदम जगभर प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे त्या झेंड्यावर कोणत्या रंगात कोणती चित्रे काढलेली होती यापेक्षा असा झेंडा तयार करून तो फडकवला गेला हे महत्वाचे आहे.

               

        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.