मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

कारगिल विजय दिवस

 🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                         

        

 💣 *कारगिल विजय दिवस* 📯


       कारगिल युध्द हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.

          हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच (ऑक्टोबर, इ.स. १९९९ मध्ये) पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली.


🌐 *स्थळ*


कारगिल हे असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगिलमध्ये काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान आहे. उन्हाळा हा सौम्य कडक तर हिवाळा अतिशय कडक असतो व तापमान उणे ४० अंश सेल्सियस पर्यंतही उतरू शकते.

        राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगिल नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैऋत्ये कडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.

        वर नमूद केल्याप्रमाणे कारगिल, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये, कारगिल युद्धाच्या आधीपर्यंत होता. या वेळेस मात्र, भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे, कारगिलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली.  या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यांत आला. तसेच, उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज लागते. त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी हे काम अजूनच अवघड करते.


      💣 *कारणे* 🔫


कारगिल शहर हे सामरिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे

इ.स. १९७१ च्या युद्धानंतर भारत व पाकिस्तानमध्ये थेट मोठे युद्ध झाले नाही. तरी सातत्याने छोट्या छोट्या चकमकी होत आहेत. सियाचीन हिमनदी वर भारतीयांचे नियंत्रण तसेच सभोवतालचा परिसरावर नियंत्रण मिळवण्यात दोन्ही बाजू सातत्याने प्रयत्‍नशील असतात. इ.स. १९८० च्या सुमारास पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पंजाबात खलिस्तानच्या नावावर दंगा घातला तसेच इ.स. १९९० च्या सुमारास काश्मीरमध्ये दहशतवादाने मूळ धरले परिणामी भारताने काश्मीरमध्ये कायम स्वरूपी सैन्य तैनात केले. हे दहशतवादी सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षित करून पाठवले जात असे. काही काळानंतर पाकिस्तानी सैनिक, अधिकारी व तालिबानी अफगाणिस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले जाऊ लागले. पाकिस्तानने नेहमीच या बाबतीत आपला सहभाग असल्याचा इन्कार केला. कारगिलच्या युद्धातदेखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्‍न केला. इ.स. १९९८ मध्ये भारत पाकिस्तानने अणु चाचण्या केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध चांगलेच ताणले गेले. परंतु बाजपेयी यांनी मैत्रीचा हात पुढे करून संबंध निवळण्याचा प्रयत्‍न केला व त्यासाठी ते स्वत: लाहोरला जाऊन आले होते.

         इ.स. १९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. (वर नमूद केल्याप्रमाणे हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे सैन्य माघारी घेतले गेले होते.) नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचे. असे केले की, महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले की. लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता. तसेच घुसखोरीदरम्यान कारगील/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता. भारतीयांनी सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवण्यात जी क्‍ऌप्ती वापरली तसाच काहीसा प्रकार पाकिस्तानने केला असा काही लेखकांचा सूर होता.


⌛ *घटनाक्रम* ⏳


⛺ *पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय चौक्यांवर कब्जा*

          घुसखोरी व व्यूहरचना

कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून, अतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायचा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळत. हवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जबाबदारी घेत असे.

        फेब्रुवारी, इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. यांतच भर म्हणजे, भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली. स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या. रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या. साधारणपणे, अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेका देणार्‍या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या ताब्यात घेण्यात आल्या. पाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीन, काश्मिरी मुजाहिदीन यांनाही या कार्यवाहीत समाविष्ट केले गेले.


🚨 *भारतीयांना उशीराने मिळालेली खबर*

          सुरुवातीला, अनेक कारणांमुळे कारगिलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झाली. भारतीय लष्कराच्या मते, हा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतो, त्यात नवे काही नाही. पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केला. मेच्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला ही मुजाहिदीन स्वरूपाची भासल्याने घुसखोरी लवकरच संपवता येईल असे वाटले. परंतु लगेचच नियंत्रण रेषेच्या बऱ्याच लांबीवर ही घुसखोरी झाल्याचे लक्षात आले. घुसखोरांकडून आलेले प्रत्युत्तर वेगळ्याच प्रकारचे होते व वरवर घुसखोरी वाटणारी घटना मोठ्या नियोजनाचा भाग आहे असे लक्षात आले. अशा रितीने कारगिल येथे युद्ध सुरू झाले आहे यावर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तानने एकूण सुमारे १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता. तर मुशर्रफ यांच्या मते १३०० चौरस किलोमीटर इतका प्रदेश ताब्यात घेण्यात आला होता.

          भारतीय सरकारने *'ऑपरेशन विजय'*  या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केली. त्यासाठी संख्येने मुळात सुमारे २,००,००० इतक्या फौजेचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होती. अर्थातच फौजेची गणसंख्या २०,००० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०,००० पर्यंत सैनिक कारगिलच्या युद्धात वापरले. घुसखोरांची संख्या पाकिस्तानी सूत्रांप्रमाणे साधारणपणे ५,००० होती. यांत पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यामधील सैनिकही समाविष्ट होते.

          भारतीय वायुसेनेकडूनही 'ऑपरेशन सफेद सागर' सुरू झाले. या ऑपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नसल्याने इथेही वायुसेनेचीही व्याप्ती मर्यादित होती.

       भारतीय नौदलानेही पाकिस्तानी बंदरांना आपले लक्ष्य केले व त्यामध्ये येणाऱ्या जहाजांची कोंडी केली. कराची बंदर हे खासकरून लक्ष्य करण्यात आले. या कृत्याने पाकिस्तानला आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबवली गेली. काही काळाने नवाज शरीफ यांनी उलगडवून सांगितले की पाकिस्तानकडे या काळात फक्त ६ दिवसांचाच इंधन साठा राहिला होता व जर पूर्ण युद्ध सुरू झाले असते तर पाकिस्तानची बरीच नाचक्की झाली असती.


🗻 *भारतीय प्रत्युत्तर* 🏔


कारगिलचे युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ रसद तोडण्यासाठी पाकिस्तानचा श्रीनगर-लेह मार्ग कापून काढायचा इरादा आहे हे नक्की झाले. भारताने सैन्य जमवाजमवीचे प्रयत्‍न सुरू केल्यानंतर पाकिस्तानकडून श्रीनगर-लेह मार्गावर मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल भारताकडून श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यास जास्त महत्त्व देण्यात आले. असे केले की हा महामार्ग सुकर होणार होता.

          घुसखोरांनी, आधुनिक शस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षित केल्या होत्या. बंदुका, स्वयंचलित मशीन गन, छोट्या उखळी तोफा व विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्या. तसेच, चौक्यांचा सभोवतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगांनी संरक्षित केला होता. यातील ८,००० सुरुंग भारतीय सेनेने युद्ध संपल्यावर निकामी केले. या चौक्यांना पाठीमागून पाकिस्तानी हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तोफखान्याचे संरक्षण मिळाले होते. पाकिस्तानने या युद्धाआधी त्या परिसराची चालकरहित विमानांमधून टेहळणीदेखील केली होती. वर नमूद केल्याप्रमाणे भारतातर्फे आधी महामार्गलगतच्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले. हा मारा बहुतांश कारगीलच्या जवळच्या भागावर केंद्रित करण्यात आला. या चौक्यांवर ताबा मिळाल्याने भारताने काबीज केलेल्या जागेत भर पडली व महामार्गही सुरक्षित होत गेला. जसा महामार्ग सुरक्षित होत गेला तसे पुढील हल्ल्यांचे नियोजन सूत्रबद्ध रितीने होत गेले.

          महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणांत टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे नोंद घेण्याजोगी होती. यानंतर बटालिक व तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष्य करण्यात आले. यातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. पॉईंट ४५९० व पॉइंट ५३५३ या त्यापैकी काही महत्त्वाच्या जागा होत्या. (या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात). ४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉइंट होता तर ५३५३ हे युद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होते. पॉइंट ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले. याच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मनुष्यहानी सोसावी लागली. जरी भारतीय सेनेने जूनच्या मध्यापर्यंत महामार्गासाठी महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यात यश मिळवले असले तरी पाकिस्तानी बाजूने युद्धाच्या अंतापर्यंत, तोफखान्याचा भडिमार चालूच होता.

          पाकिस्तानी सैन्याने पाडलेल्या भारतीय विमानाचे अवशेष भारताने जेव्हा महामार्गालगतच्या महत्त्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषेपलीकडे पिटाळायचे धोरण आखले. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावले. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिलवर उशीरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्त्वाची लढाई होती असे मानतात. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्‍न झाले. पाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. सरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक म्रुत्यूमुखी पडल्याचे कळते.

         या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्‍ऌप्त्यांचा चांगलाच वापर केला. काही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुसलमान तुकड्यांनी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या. बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती. त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होते. परंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाऊ होत्या. तसेच या उंचीवरील अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या. या भागात सर्व चौक्यांना वेढा देऊन घुसखोरांचा रसद पुरवठा तोडून कमी जोखमीचे चे युद्ध करणे भारताला शक्य होते तसेच पूर्णपणे हवाई हल्ले चढवून घुसखोरांच्या ताब्यातील चौक्या मिळवणेही शक्य होते. परंतु या साठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होते. जर तसे केल्यास पूर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारत सरकार यासाठी तयार नव्हते. जर असे झाल्यास या युद्धात मिळालेली आंतरराष्ट्रीय सहानुभूती भारत गमावेल अशी त्यांना भीती होती.

       भारताने इ.स. १९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या.


🔮 *भारतीयांचे गमावलेल्या प्रदेशावर नियंत्रण*

     मे २६, इ.स. १९९९ - भारताचे घुसखोरांवर हवाई हल्ले.


जुलै १२, इ.स. १९९९ - पाकिस्तानचे शांततेचे आवाहन.


🔎 *कारगील युद्धाची परिणती*


 🇮🇳 *भारत*


तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. कारगील युद्धामधील त्यांच्या नेतृत्वामुळे १९९९ च्या निवडणुकात भा.ज.प. ला यश मिळाले.

कारगिलचे युद्ध हे भारतीय लोकसभा बरखास्त झाल्यानंतर झाले होते, तरीही युद्धाच्या सुरुवातीला विरोधी पक्षानेही सत्तारूढ पक्षाला लष्करी कारवाईसाठी चांगलाच प्रतिसाद दिला, त्यामुळे भारतीय राजकारणात फारशी न दिसणारी एकता कारगिल युद्धाच्या निमित्ताने दिसली. मात्र, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सत्ताधारी पक्षाला विजयाचे श्रेय घेणे लाभदायक ठरणार होते, म्हणून सैनिक कारवाई सुरू करण्यास विलंब लावला, असा आरोप युद्ध पार पडल्यावर विरोधी पक्षाने केला. या आरोपानंतरही भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुढील निवडणुकीत भरघोस यश मिळवले. निवडणूकपूर्व आघाडीने संपूर्ण बहुमत मिळवले असे हे इ.स. १९८४ नंतर प्रथमच घडले..


कारगीलचे युद्ध भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. अनेक वाहिन्यांची युद्धक्षेत्रात जाउन बातम्यांचे संकलन करण्यात चढाओढ झाली. त्यामुळे भारतीय नागरिकांना प्रथमच भारतातील युद्धाची क्षणचित्रे टीव्हीवर पहायला मिळाली. यामुळे भारतात एकंदर राष्ट्रीयत्वाच्या विचारसरणीने चांगलेच मूळ धरले. या युद्धानंतर भरलेल्या कित्येक सैन्य भरती शिबिरांना अनेक राज्यात अफाट प्रतिसाद मिळाला.


या युद्धात भारतीय गुप्तहेर खात्याचे कच्चे दुवे स्पष्ट झाले, संपूर्ण जगातून गुप्तहेर खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे हे युद्ध झाल्याचे मत प्रदर्शित झाले होते. तसेच युद्धादरम्यान भारतीय सैन्याकडे अतिउंचीवर लढण्यासाठी पुरेशी साधने नव्हती. त्यामुळे युद्धानंतर भारताने सैन्यखर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली.


🇵🇰 *पाकिस्तान*


कारगिलच्या युद्धानंतर पाकिस्तानी राज्यकर्त्यांमधील कच्चे दुवे बाहेर आले. पाकिस्तानातील नवाज शरीफ यांचे लोकशाही सरकार व लष्कर यांच्यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता हे सिद्ध झाले. सूत्रांनुसार नवाज शरीफ यांना या युद्धाबद्दल फारशी माहिती नव्हती असे कळते. तसेच युद्धादरम्यानही पाकिस्तानी लष्कराने शरीफ यांना अद्यतने दिली नाहीत. त्यामुळे नवाज शरीफ यांना आंतराष्ट्रीय स्तरावर या युद्धासाठी मान्यता मिळवणे अवघड गेले. अगदी युद्धाच्या काळात नवाज शरीफ यांना, त्यांच्या अगदी जुना लष्करी मित्र असलेल्या अमेरिकेनेही सैन्य माघारीचा सल्ला दिला. पाकिस्तानने सुरुवातीपासूनच हे सैनिक आमचे नाहीत हा पवित्रा घेतल्याने शहीद सैनिकांचा स्वीकार करण्यास नकार दिला. ज्या सैनिकांना मानाने अंत्यसंस्कार मिळायला पाहिजे होते, त्यांचे संस्कार भारतीय सैन्याने केले. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर मध्येही सरकार विरुद्ध जनमताची लाट उसळली.


पाकिस्तान सरकार व पाक लष्कर यांच्यातील दरी वाढत गेली. असे कळते की मु्शर्रफ यांच्यावर कारवाईची तयारी शरीफ यांनी केली होती परंतु मु्शर्रफ यांनी शरीफ यांचे प्रयत्‍न फोल पाडले. यादरम्यान एका घटनेत मु्शर्रफ यांचे विमान इस्लामाबाद येथे उतरून देण्यास नकार दिला, परंतु त्यांचे विमान त्यांच्या निष्ठावंतानी दुसऱ्या विमानतळावर उतरवून मु्शर्रफ यांचा जीव वाचवला. मु्शर्रफ यांनी हत्येचा प्रयत्‍न या आरोपाखाली शरीफ यांचे लोकशाही सरकार उलथून लावले व पाकिस्तानात आणीबाणी लागू केली. त्यानंतर काही दिवसातच पाकिस्तानच्या भल्यासाठी आपले सत्तेत राहणे गरजेचे आहे, असे दूरचित्रवाणीवर सांगत लष्करी राजवट लागू केली.


📺 *माध्यमांचा प्रभावी वापर*


कारगीलचे युद्ध हे भारतीय माध्यमांसाठी एक मैलाचा दगड ठरले. कारगीलच्या युद्धाच्या वेळेस भारतीय माध्यमांनी जागतिकीकरणात उडी घेतली होती व बी.बी.सी , सी.एन,एन्. या आंतराष्ट्रीय दर्जाच्या वाहिन्यांचा दर्जा गाठण्यास सुरुवात केली होती. कारगील युद्धाच्या निमित्ताने या वाहिन्यांनी युद्धाच्या जास्तीत जास्त बातम्या सादर करण्यात पुढाकार घेतला. भारतीय सैन्यानेही यात मागे न रहाता, माध्यमांचा वापर काळजीपूर्वक आपल्या सोयींकरता करून घेतला. त्यामुळे युद्धाबाबत भारतीय सैन्याला सहानूभूती मिळवणे सोपे गेले. तसेच युद्धदृश्ये व त्यांच्या यथायोग्य विश्लेषणामुळे भारतीयांमध्ये ऐक्याची भावना वाढीस लागली.


जसजसे युद्ध पुढे सरकत गेले तसतसे माध्यमांनी प्रक्षेपण अजून वाढवले. प्रक्षेपणाची व्याप्ती भारतात पाकिस्तानपेक्षा खूप जास्ती होती. काही वाहिन्यांनी सरळसरळ युद्धक्षेत्रात जाउन युद्धाचे थेट प्रक्षेपण केले. भारतीय सैन्यांच्या तोफांचा मारा काही खास करून दाखवला गेला. यामुळे बोफोर्स तोफांबद्दलचा भारतीय जनमानसातील राग कमी झाला. सीएन्‌एन्‌ने आखाती युद्धाचे जसे प्रक्षेपण दाखवले तसेच काहीसे भारतीय माध्यमांनी दाखवले. भारतीय माध्यमांचे यश पाकिस्तानी माध्यमानीही कबूल केले, कराची येथे झालेल्या कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानी पत्रकारांनी नमूद केले की भारतीय सरकारने माध्यमांना व जनतेला विश्वासात घेतले तर पाकिस्तानने एकदम विरुद्ध अशी भूमिका घेतली.


भारतातील व जगभरातील वृत्तपत्रेही भारताच्या बाजूने सहानूभूतिमय होती. पाश्चिमात्य देशांनी सरळसरळ सहानूभूती प्रदर्शित न करता हे युद्ध भडकवल्याचा ठपका पाकिस्तानवरच ठेवला. काही तज्‍ज्ञांच्या मते भारतातील माध्यमांनी या युद्धासाठी लागणार्‍या बाह्य शक्तींचे काम केले व भारतीय सैन्याचा उत्साह दुणावणारी कामगिरी केली. जसे युद्ध पुढे सरकत गेले तसतसा पाकिस्तान या पातळीवर मागे पडू लागला व भारताने महत्त्वाची अशी आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडी मिळवली.



  🙏🌹 *कारगिल युध्दात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन* 🙏🌷                                                                                                                     ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट