निवडणूक अनामत रक्कम (Security Deposit) म्हणजे नेमकं काय?
निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवाराला त्यांच्या जिल्ह्यात किंवा ज्या ठिकाणी निवडणूक आहे तिथं निवडणूक आयोगानं एक अधिकारी नेमलेला असतो त्या अधिकाऱ्याकडे एक विशिष्ट रक्कम जमा करावी लागते त्याला अनामत रक्कम म्हणतात.
हे पैसे रोख स्वरुपात किंवा उमेदवाराच्या नावानं सरकारी तिजोरी पैसे जमा केल्याची पावती निवडणूक अर्जासोबत जोडायची असते. पण, ही अनामत रक्कम का जमा केली जाते? तर प्रामाणिकपणे निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज दाखल करावे, इतर कोणीही अर्ज दाखल करू नये यासाठी ही अनामत रक्कम घेतली जाते.
कोणत्या निवडणुकीसाठी किती डिपॉझिट?
सर्व निवडणुकांसाठी ही अनामत रक्कम सारखीच असते का? तर नाही. प्रत्येक निवडणुकांनुसार अनामत रक्कम बदलत असते. 1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार,
लोकसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 25 हजार रुपये अनामत रक्कम निवडणुकीचा अर्ज भरताना द्यावी लाते. पण, उमेदवार जर अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जमातीचा असला तर त्यांना या रक्कमेतून 50 टक्के सूट देण्यात आली आहे. म्हणजे या समाजातील उमेदवाराला फक्त 12500 रुपये अनामत रक्कम भरावी लागते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठीही लोकसभेसारखीच अनामत रक्कम द्यावी लागते.
विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी 10 हजार रुपये अनामत रक्कम ठरवून दिलेली आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातींच्या उमेदवारांना 5 हजार रुपये भरावे लागतात.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत देखील 15 हजार रुपयांची अनामत रक्कम द्यावी लागते.
डिपॉझिट जप्त का केलं जातं?
पण, निवडणुकीनंतर काही उमेदवारांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट जप्त होत असते. मग डिपॉझिट जप्त होणे म्हणजे नेमकं काय?
1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, उमेदवाराला एकूण वैध मतांच्या 1/6 मतं मिळाले नसतील तर अशा उमेदवारांचं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केलं जातं. ज्या उमेदवारांना 1/6 मतं मिळतात त्यांचं डिपॉझिट निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर परत केलं जातं.
एखाद्या उमेदवाराचा निवडणुकीच्या आधी मृत्यू झाला असेल किंवा त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असेल तर अशा उमेदवाराचं सिक्युरीट डिपॉझिट परत केलं जातं.
एकच उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढत असेल आणि त्या उमेदवाराला एकूण मतांच्या 1/6 मतं मिळाली असतील तरी त्याला फक्त एक अनामत रक्कम परत केली जाते. इतर मतदारसंघातील अनामत रक्कम जप्त केली जाते.
अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा असतो. यावेळी या अर्जात तुम्ही इतर मतदारसंघातून निवडणूक लढली होती का? असा प्रश्न विचारला जातो. जर दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढली असेल तर त्या मतदारसंघातल्या अनामत रकमेसाठी अर्ज केला नाही असं त्या उमेदवाराला जाहीर करावं लागतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏