थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक
विनोबा भावे
जन्म. ११ सप्टेंबर १८९५ रायगड जिल्ह्यामधील गागोदे या गावी.
विनायक उर्फ विनोबांना तरूणपणात दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक, हिमालयाच्या सहवासात राहून अध्यात्माची जोपासना करावी आणि दुसरे म्हणजे बंगालमधील सशस्त्र क्रांतीचा विचार. या दोन्ही गोष्टींचा मिलाफ त्यांना महात्मा गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात पहावयास मिळाला. भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’सारख्या ग्रंथांतून सांगणाऱ्या विनोबांची भेट ७ जून १९१६ रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले.सत्य आणि अहिंसा या दोन चिरंतन तत्त्वांच्या अंमलबजावणीने ‘सर्वोदय’ होईल ही महात्मा गांधीजींची कृतिशील जीवननिष्ठा विनोबांच्या जीवनाचे शक्तिशाली अधिष्ठान होते. बहुभाषिक विनोबांनी वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, गीता, संत साहित्य, विविध भाष्ये यांचा जसा अभ्यास केला, तसा कुराण, बायबल, धम्मपद, जपुजी (शिखांचा हरिपाठ) इत्यादी धार्मिक ग्रंथांचेही मनःपूर्वक वाचन आणि चिंतन केले होते.
दुर्बळ, वंचित, उपेक्षित आणि पीडित यांच्यासंबंधी अपार करूणा हे संत-महात्म्यांचे अंगभूत वैशिष्ट्य होय. आचार्य विनोबांची जगप्रसिद्ध ‘भूदान चळवळ’ म्हणजे तर त्यांच्या करूणेचा एक आगळा-वेगळा अविष्कार होय! जमीनदारी पद्धत ही ग्रामीण समाजातील दारिद्र्याचे मूळ. त्यामधून तेलंगणामध्ये जमीनदारांचे खून पडू लागले. ‘कसेल त्याची जमीन’ कायदा करूनही हा विषमतेचा प्रश्न सुटत नव्हता. म्हणून विनोबांनी महात्माजींची सत्य आणि अहिंसा ही दोन हत्यारे हाती घेऊन शांतीच्या मार्गाने या प्रश्नाचे उत्तर शोधले, ते म्हणजे त्यांची ‘भूदान चळवळ’! एक उघडा, शरीराने कृश वाटणारा आणि साठीकडे वाटचाल करणारा म्हातारा हजारो मैल पायी तुडवत खेड्याखेड्यातून ऊन, पावसाची पर्वा न करता जमिनीचे दान मागत हिंडतो आहे आणि लाखो एकर जमीन मिळवून त्याचे भूमीहीन शेतमजुरांना, शेतकऱ्यांना वाटप करतो ही जगाच्या इतिहासातील अपूर्व आणि अलौकिक घटना होती! १८ एप्रिल १९५१ रोजी सुरू झालेल्या या भूदान चळवळीने पहिल्या दोन महिन्यांत १२ हजार एकर जमीन ‘दान’ म्हणून मिळवली होती.
श्रम आणि सर्वांगिण प्रतिष्ठा यांची तथाकथित बुद्धिवाद्यांनी केलेली फारकत हेच दुष्ट जातीय विषमतेचे मूळ आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली तर वर्गभेदही नष्ट होतील असाही विचार ते मांडीत असत. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ‘गीता रहस्य’मध्ये जो कर्मयोग मांडला, तो त्यांना मान्य नव्हता. त्यांनी गीतेमध्ये शांती आणि अहिंसेचा शोध घेतला. गीता ही मानवी सद्विाचार आणि असद्भावना यांच्यातील संघर्ष चित्रित करणारा अद्वितीय ग्रंथ आहे अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या ‘गीताई’ आणि ‘गीता प्रवचने’ या ग्रंथाच्या सुमारे पाऊण कोटी हून अधिक प्रती आजवर वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला आहे. विनोबा भावे यांचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏