मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

गुरुवार, २३ मे, २०२४

विठ्ठल सखाराम पागे

 


                 *विठ्ठल सखाराम पागे*                                                                  (स्वातंत्र्य सैनिक व रोजगार हमी योजनेचे जनक)                        
          
     *जन्म : 21 जुलै 1910*
    (वाळवा, सांगली, महाराष्ट्र)
      *मृत्यू : 16 मार्च 1990*
 शिक्षण : B.A.LLB                                                   ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा १६ मार्च हा २० वा स्मृतिदिन. श्री. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते.

वकील, समाजसेवक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, चिंतक, अर्थव्यवस्थेचे अभ्यासक आणि विश्लेषण करून उपाय सुचविणारे प्रशासक अशी त्यांची अनेक रूपे होती. त्याशिवाय संत वाङ्मयाचा आणि संस्कृताचा गाढा अभ्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच वैशिष्टय़ होते. अठरा वर्षे विधान परिषदेचे सभापतिपद सांभाळणे आणि तेही कोणत्याही अपवादाचा किंवा प्रवादाचा विषय न होता सांभाळणे ही कामगिरी फार थोडय़ा लोकांना जमू शकते. विशेषत: वै. पागे यांच्या कारकीर्दीत अनेक मातब्बर नेते सभागृहाचे सदस्य होते. विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमांचा अतिशय सूक्ष्म अभ्यास करून सरकारला कचाटय़ात पकडणारे जागरूक नेते विरोधी पक्षांमध्ये होते. अशावेळी कै. पागे अतिशय शांतपणे, कायदे आणि नियमांचा अर्थ लावून सुस्पष्ट निर्णय देत, की तो आपोआपच सर्वाना मान्य ठरत असे. परंतु त्यांच्या विधिमंडळातील कारकीर्दीपेक्षाही त्यांची आठवण महाराष्ट्राला व देशाला राहील ती ‘रोजगार हमी योजने’चे जनक म्हणूनच.
‘रोजगार हमी योजनेचा’ कायदा तयार करून सरकारला सादर करून त्यांची अंमलबजावणी करायला लावणे. तिच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि कालानुरूप तिच्यात बदल सुचविणे ही सारी कामे कै. पागे यांनी केली. एखाद्या राज्याच्या विकासकार्यात इतक्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी एखाद्या नेत्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कार्य केल्याचे दुसरे उदाहरण क्वचितच असेल. अकुशल ग्रामीण बेरोजगारांना स्वत:च्या परिसरामध्ये रोजगार प्राप्त करून देणारी ही योजना कोटय़वधी बेरोजगारांना अक्षरश: वरदानच ठरली आहे. या योजनेमुळे शहरांकडे जाणाऱ्या लोंढय़ांचे स्थलांतराचे प्रमाण नि:संशयपणे कमी झाले आहे. १९६९ साली कै. श्री. पागे यांच्या सांगली जिल्ह्य़ातील विसापूर गावी सदर योजना प्रथम सुरू झाली व नंतर व्यापक प्रमाणावर राबविण्यात आली.
सदर योजनेचा गौरव संयुक्त राष्ट्रसंघात करण्यात आला आहे. काही मागास आफ्रिकन देशांमध्ये ही योजना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे राबविण्यात येत आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांना त्यांची उपयुक्तता पटली व सदर योजनेबाबत कायदा संसदेमध्ये संमत करून त्यांची देशभर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये ग्रामीण बेरोजगारी हटविण्याची क्षमता असल्याने दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये वाढीव तरतूद भारत सरकारतर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखविणारे कै. श्री. पागे हे अभ्यासू चिंतक होते. विधिमंडळाबद्दल त्यांनी काही विचार व्यक्त केले आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, समाजकल्याण विषयक बाबी संबंधीची विधेयके विधान परिषदेत मांडून विधानसभेच्या कामाचा व्याप कमी करता येईल असे त्यांनी सुचविले होते.
अध्यात्म, संतवाङमय आणि संसदी परंपरा हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यावर बोलताना वि. स. पागे रंगून जात असत. त्यांच्या निवेदनात रसाळपण तर असेच पण या विषयांचा गाढ अभ्यासही जाणवत असे. संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंगही दांडगा होता. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणांमधून सतत जाणवत असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्यांच्या भाषेलाही संस्कृतच्या सहवासामुळे एक अभिजात भारदस्तपणा प्राप्त झालेला होता.
कै. वि. स. पागे हे उत्तम दर्जाचे कवी. नाटककार होते. १९३२-३३ च्या सुमारास त्यांनी ‘वीर मोहन’ नावाचे नाटक लिहिले होते. ‘निवडणुकीचा नारळ’ नावाची नाटिका लिहिली होती. त्याचप्रमाणे ‘पहाटेची नौबत’ आणि ‘अमरपक्षी’ या नावाचे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
‘तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत’ हे त्यांनी लिहिलेले सुंदर संगीत नाटक, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक कै. श्री. दाजी भाटवडेकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. तसेच संत तुकारामांची प्रमुख भूमिकाही त्यांनीच साकारली होती. सामान्यातून साधुत्वापर्यंतचा संत तुकारामांचा प्रवास सदर नाटकामध्ये सादर केला आहे.
खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा त्रिवेणी संगम जीवनात असलेल्या कै. वि. स. पागे यांची स्मृती जतन करण्यासाठी, त्यांच्या व्यापक व व्यासंगी विचारांचा अभ्यास होण्यासाठी शासनाकडून समाजातील विचारवंतांच्या, अभ्यासकांचा सहकार्यातून योग्य ते स्मारक व्हावे ही अपेक्षा.
                                                                                                                                  
            🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳    
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट