*भारतीय कोकिळा*
*सरोजिनी नायडू*
*जन्म : 13 फेब्रुवारी 1879*
(हैद्राबाद, आंध्रप्रदेश)
*मृत्यु : 2 मार्च 1949*
(अलाहाबाद, उत्तरप्रदेश)
पति : डॉ. एम. गोविंदराजलु नायडू
मुलं : जयसूर्य, पद्मजा नायडू, रणधीर आणि लीलामणि
विद्यालय : मद्रास विश्वविद्यालय, किंग्ज़ कॉलेज लंडन, गर्टन कॉलेज कैम्ब्रिज
नागरिकत्व : भारतीय
पुरस्कार उपाधी : केसर ए हिंद
रचना : द गोल्डन थ्रेशहोल्ड, बर्ड ऑफ टाईम, ब्रोकन विंग
भारताची कोकिळा सरोजीनी नायडु त्या अमर आत्म्याचे नाव आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य समरात आपले महत्वपुर्ण योगदान दिले. सरोजिनी नायडु त्या क्रांतिकारी महिलांपैकी एक आहेत ज्यांनी गुलामगिरीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता प्रचंड संघर्ष केला.
सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या या शिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या देखील होत्या. त्यांचे भाषण ऐकुन मोठ मोठे दिग्गज देखील मंत्रमुग्ध होऊन जात. त्या इंडियन नॅशनल कॉंग्रेस च्या पहिल्या प्रेसिडेंट होत्या. त्या उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल म्हणुन नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतिय महिला होत्या.
भारतिय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना भारताची नाइटिंगेल व भारताची कोकिळा देखील म्हंटल्या जात होतं. त्यांच्या कवितांमधे लहान मुलांच्या, निसर्गाच्या, देशभक्तीच्या, प्रेमाच्या आणि मृत्युच्या कविता आहेत विशेषतः लहान मुलांच्या कविता करण्याकरीता त्या प्रसिध्द होत्या. त्यांच्या कविता वाचुन अधिकतर लोक आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रममाण होत असत त्यांच्या कवितांमधे एक खोडकरपणा आढळुन यायचा त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या लहानपणाची झलक सापडायची आणि म्हणुनच त्यांना ’भारताची कोकिळा’ म्हंटले जात होते.
वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच सरोजिनीं मधली प्रतिभा दिसायला लागली या लहान बालिकेच्या कविता वाचुन प्रत्येकजण आश्चर्यचकीत व्हायचा. त्यांनी तेव्हांपासुनच वृत्तपत्रांमधे लेख आणि कविता लिहीण्यास सुरूवात केली होती. देशप्रेमाची भावन देखील त्यांच्यात ओतप्रोत भरली होती आणि म्हणुनच राष्ट्रीय आंदोलना दरम्यान त्या महात्मा गांधीच्या सोबत होत्या, त्यांच्या समवेत त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात हिरीरीने सहभाग घेतला.
सरोजिनी नायडुंची कन्या पद्मजा हिने देखील स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नोंदवला आणि ती भारत छोडो आंदोलनाचा हिस्सा होती. आज जेव्हां ही भारताच्या महान क्रांतिकारी महिलांची चर्चा होते त्यावेळी सरोजिनी नायडुंचे नाव सर्वात आधी घेण्यात येते. सरोजिनी नायडु सगळया भारतीय महिलांकरीता एक आदर्श होत्या.
💁🏻♀ *महान क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंचे प्रारंभिक जीवन, कुटूंब आणि शिक्षण*
भारतिय महान क्रांतिकारक सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला एका बंगाली कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते ते वैज्ञानिक, शिक्षाशास्त्री, डॉक्टर आणि शिक्षक होते हैद्राबाद येथील निज़ाम कॉलेजची स्थापना त्यांनी केली होती. पुढे त्यांच्या वडिलांना प्रिंसिपल पदावरून कमी करण्यात आले होते त्यानंतर ते नॅशनल काँग्रेस हैद्राबाद चे पहिले सदस्य बनले. आपली नौकरी सोडुन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती.
स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडु यांच्या आईचे नाव वरद सुंदरी देवी होते त्या बंगाली भाषेत कविता करीत असत. सरोजिनी नायडुंना एकुण 8 बहिण भाऊ होते त्यांच्यात सरोजिनी या सर्वात मोठया होत्या. त्यांचा एक भाऊ विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय क्रांतिकारी होता त्याने बर्लिन कमेटीत आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती. त्याला 1937 साली एका इंग्रजाने मारून टाकले. सरोजिनींचे दुसरे बंधु हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय एक प्रसिध्द कवि, कथाकार, व कलाकार होते या व्यतिरीक्त ते नाटकं सुध्दा लिहीत असत. त्यांची बहिण सुनालिनी देवी या एक उत्तम नृत्यांगना व अभिनेत्री होत्या.
बालपणापासुन सरोजिनी या एक हुशार विद्यार्थिनी होत्या त्यांना उर्दू, तेलगू, इंग्लिश, बांग्ला आणि फारसी भाषेचे चांगले ज्ञान होते. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी मॅट्रिक परिक्षा त्यांनी उत्तीर्ण केली मद्रास प्रेसीडेंसीत प्रथम स्थान मिळवीले. देशाकरीता स्वतःला समर्पित करणाऱ्या महान क्रांतिकारी सरोजिनीने गणितज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावं अशी त्यांचे वडिल अघोरनाथ चट्टोपाध्याय यांची ईच्छा होती परंतु सरोजिनी यांना लहानपणापासुन कविता लिहीण्याचा छंद होता. कविता लिहीण्याची आवड त्यांच्यात आईकडुन आली होती.
बालपणी त्यांनी चक्क 1300 ओळींची कविता लिहीली होती. त्यांच्या कविता आणि लिखाण प्रत्येकाला प्रभावित करीत असे त्यांच्या कवितेने हैद्राबाद चे निजाम देखील प्रभावित झाले होते आणि त्यांनी सरोजिनींना विदेशात अध्ययन करण्याकरीता शिष्यवृत्ती देखील दिली होती. वयाच्या 16 व्या वर्षी जेव्हां त्या इंग्लंड येथे गेल्या तेव्हां त्यांनी प्रथम किंग्स काॅलेज लंडन येथे प्रवेश घेतला.
पुढे कैम्ब्रिज च्या ग्रिटन कॉलेज मधुन शिक्षण प्राप्त केले त्याठिकाणी त्यांची भेट त्या काळातील इंग्लिश चे प्रसिध्द कवि आर्थन साइमन आणि इडमंड गोसे यांच्याशी झाली. त्यांनी सरोजिनींना भारतिय विषयांना लक्षात ठेवत लिखाण करण्यास व डेक्कन (दक्षिण पठार) ची भारतिय कवयित्री होण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर महान कवयित्री सरोजिनी नायडुंना भारतातील पर्वत, नद्या, मंदिरे आणि सामाजिक बाबींना आपल्या कवितांमध्ये समाविष्ट करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे सरोजिनी भारतातील एक महान कवियत्री झाल्या त्यांच्या कवितांमुळे त्यांनी लाखो हृदयांमध्ये स्थान मिळविले.
👫🏻 *सरोजिनी नायडुंचा विवाह*
भारताच्या महान कवियित्री सरोजिनी नायडु ज्यावेळी इंग्लंड येथे शिक्षण घेत होत्या त्या दरम्यान त्यांची भेट गोविंद राजुलू नायडूंशी झाली त्यावेळीच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नायडू हे त्या वेळी इंग्लंड येथे फिजिशियन होण्याकरता गेले होते. शिक्षण पुर्ण केल्यानंतर भारतात परतल्यावर आपल्या परिवाराच्या संमतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांचा गोविंद नायडूंशी विवाह झाला.
1898 साली त्यांचा विवाह हा ब्राम्हो मॅरेज अॅक्ट अंतर्गत मद्रास येथे संपन्न झाला. त्यांचा विवाह हा आंतरजातिय होता त्याकाळी वेगवेगळया जातींमध्ये लग्न होणे हे एखाद्या गुन्हयापेक्षा कमी समजले जात नव्हते कारण त्यावेळी आंतर जातिय विवाहांना भारतिय समाजात मान्यता मिळाली नव्हती.
हे एक क्रांतिकारी पाऊल होते याकरता त्यांना फार संघर्ष करावा लागला होता परंतु त्यांच्या वडिलांनी समाजाची चिंता न करता आपल्या निर्भय आणि सुशिक्षीत अश्या सरोजिनीला तिच्या निर्णयात पुर्ण सहाय्य केले. या सर्व विपरीत परिस्थीती पश्चात त्यांचे वैवाहीक जीवन यशस्वी ठरले विवाहापश्चात त्या चार मुलांच्या आई झाल्या जयसुर्या, पद्मजा, रणधीर आणि लीलामणी अशी चार अपत्ये त्यांना झाली.
सरोजिनींची कन्या पद्मजा त्यांच्यासारखीच कवियित्री झाली शिवाय ती सक्रीय राजकारणात उतरली आणि 1961 ला पश्चिम बंगाल ची गव्हर्नर देखील झाली.
⚜ *सरोजिनी नायडुंचे राजनितीक जीवन आणि स्वातंत्र्य संग्रामातील भुमिका*
सामान्य महिलांपेक्षा सरोजिनी अगदी भिन्न होत्या त्यांच्यात कायम काहितरी करण्याची उर्जा आणि उमेद होती त्यामुळे विवाहानंतर देखील त्यांनी लिखाण सुरू ठेवले त्यांच्या कवितांच्या प्रशंसकांमध्ये देखील हळुहळु वाढ होत गेली व लोकप्रियता देखील वाढत गेली.
कविता लिहीण्यात त्यांचे प्रभुत्व होते आणि साहित्याची देखील त्यांना चांगली जाण होती. आपल्या अवती भवतीच्या गोष्टी, भारताचे प्राकृतिक सौंदर्य आणि इतर ही विषयांना त्या आपल्या कवितांच्या माध्यमातुन अतिशय सुरेख पणे मांडत असत. त्यांच्या कवितांवर प्रेम करणारा फार मोठा रसिक वर्ग होता जो त्यांच्या कवितांना गाण्यांसारखे गुणगुणायचा.
1905 साली त्यांची बुल बुले हिंद ही कविता प्रकाशित झाली त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखीन भर पडली त्यानंतर एकामागोमाग सलग त्यांच्या कविता प्रकाशित होत गेल्या ज्यामुळे वाचकांच्या मनात त्यांनी एक जागा निर्माण केली. सरोजिनींच्या प्रशंसकांच्या यादीत जवाहरलाल नेहरू, रविन्द्रनाथ टागौर यांसारखे महान व्यक्तिमत्व देखील होते. सरोजिनी आपल्या कविता इंग्लिश भाषांमधुन देखील लिहीत असत.
त्यांच्या कवितांमधुन भारताच्या संस्कृतीचे अनोखे चित्र पहावयास मिळते. अश्या महान कवियित्री सरोजिनी नायडूची भेट ज्यावेळी भारताचे स्वातंत्र्य सेनानी गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी झाली तेव्हां त्यांच्या जीवनात मोठा बदल घडला. गोखलेंनी सरोजीनींना आपल्या लिखाणाची ताकद स्वातंत्र्याच्या लढाईत वापरण्याचा सल्ला दिला.
गोपाळ कृष्ण गोखलेंनी सरोजिनींना आपली बुध्दी आणि शिक्षण पुर्णपणे देशाला समर्पित करण्यास सुचविले. शिवाय ते त्यांना हे देखील म्हणाले की तुम्ही क्रांतीकारी कविता लिहा आणि स्वातंत्र्याच्या या लढाईत लहान लहान गांवामधील लोकांना प्रोत्साहीत करा जेणेकरून वर्षानुवर्ष गुलामगिरीत अडकलेले सामान्यजन मोकळा श्वास घेऊ शकतील आणि या समरात सहभागी होतील. सरोजिनींनी गोपाळकृष्ण गोखलेंच्या या सल्ल्यावर सखोल विचार केला आणि आपले व्यावसायिक लिखाण बंद करून स्वतःला राजकारणात पुर्णपणे समर्पित करून टाकले.
1905 साली बंगालच्या विभाजना वेळी महान क्रांतीकारी महिला सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधे सहभागी झाल्या होत्या. विभाजनामुळे त्या फार व्यथीत देखील होत्या पुढे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्या एक निष्ठावान देशभक्ता प्रमाणे सतत प्रयत्नं करत होत्या सामान्य जनांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत चेतवण्याकरीता संपुर्ण भारत त्यांनी पिंजुन काढला व लोकांमध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लावण्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले.
सरोजिनी नायडुंनी मुख्यतः स्त्रियांच्यात जाऊन देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्याकरीता आपले क्रांतिकारी विचार प्रगट केले. ज्या सुमारास सरोजिनी नायडू महिलांमध्ये हे क्रांतीकारी विचार पेरत होत्या त्यावेळेसच्या काळात महिलांनी स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये कैद करून घेतले होते. त्या काळात महिलांची स्थिती फार मागासलेली होती. अश्या काळात स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेणे तर दुर स्त्रियांना घराबाहेर पाऊल ठेवण्याची देखील परवानगी नव्हती.
अश्या परिस्थीतीत चुल आणि मुल सांभाळणाऱ्या स्त्रियांची मानसिकता बदलणे हे कार्य अजिबात सोपे नव्हते परंतु या स्त्रियांना स्वातंत्र्य समरात येण्यास प्रोत्साहीत करणे हे अवघड काम सरोजिनी नायडू मोठया निष्ठेने करीत होत्या. सरोजिनी नायडू गावां गावांमध्ये जाऊन स्त्रीयांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दयायच्या आपल्या विचारांनी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहीत करीत असत या शिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या अधिकारांकरता सुध्दा आपला आवाज बुलंद केला होता.
1916 ला जेव्हां त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी त्या गांधीजींच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांची विचारसरणी पुर्णपणे बदलुन गेली. सरोजिनी गांधीजींना आपला आदर्श मानु लागल्या, गांधीजींपासुन प्रेरणा घेत त्यांनी आपली पुर्ण ताकत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात लावली.
1919 साली क्रुर ब्रिटीश शासनकर्त्यांनी रॉलेट एक्ट समंत केला या अंतर्गत राजद्रोह दस्तऐवजावर कब्जा करणे अवैध मानण्यात आले होते. महात्मा गांधीजींनी या एक्ट विरोधात असहकार आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलनात सरोजिनी नायडूंनी गांधीजींचे पुर्णपणे समर्थन केले. गांधीजींच्या शांततापुर्ण नितीचे आणि अहिंसावादी विचारांचे पालन देखील केले.
या व्यतिरीक्त त्यांनी मोंटगु-चेम्सफोर्ड सुधारणा, खिलाफत आंदोलन, साबरमती संधी सत्याग्रह आणि नागरिक अवज्ञा आंदोलना सारख्या इतर आंदोलनांचे देखील समर्थन केले. एवढेच नव्हें तर सविनय कायदेभंग आंदोलनात त्या गांधीजींसमवेत कारागृहात देखील गेल्या. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना 21 महिने कारागृहात राहावे लागले होते या दरम्यान त्यांना कित्येक यातना देखील सहन कराव्या लागल्या होत्या. अश्या त-हेने स्वातंत्र्य संग्रामा दरम्यान त्यांनी कित्येक दिवस जेल मध्ये काढले आणि एक सच्च्या देशभक्ताचे कर्तव्य पार पाडले.
⚛ *राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष आणि राज्यपालाच्या रूपात सरोजीनी नायडू*
सरोजिनी नायडूंचे स्वातंत्र्याच्या लढाईतील योगदान आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव सामान्य जनतेवर पडला होता त्या दरम्यान त्यांची लोकप्रियता आणखीन वाढली होती. त्यांच्या विचारांनी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू अत्यंत प्रभावित झाले होते.
त्यांची प्रतिभा पाहुन 1925 साली त्यांना काँग्रेस अधिवेशनाची अध्यक्षा म्हणुन नियुक्त करण्यात आले पुढे 1932 ला भारताच्या प्रतिनिधी या नात्याने त्या दक्षिण अफ्रिकेत देखील गेल्या होत्या. भारताच्या क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंनी भारताच्या स्वांतत्र्याकरता भारतियांव्दारे केल्या जाणाऱ्या अहिंसात्मक संघर्षाचे बारकावे सादर करण्यात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती.
एवढेच नव्हें तर त्यांनी गांधीवादी सिध्दांताचा प्रसार करण्याकरता केवळ युरोपातच नव्हे तर संयुक्त राज्य अमेरीकेपर्यंतची यात्रा केली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर उत्तरप्रदेशाच्या पहिल्या गव्हर्नर (राज्यपाल) झाल्या. स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या गव्हर्नर होत्या भारताच्या सर्वात मोठया राज्याच्या त्या राज्यपाल झाल्या. सरोजिनी नायडूंनी आपल्या महान विचारांनी आणि गौरवपुर्ण व्यवहाराने आपल्या राजनितीक कर्तव्यांना उत्तम रितीने पार पाडले आणि त्यामुळे त्यांचे आजही स्मरण केले जाते.
🕯 *सरोजिनी नायडूंचा मृत्यु*
देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता कठोर संघर्ष करणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी व महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्या सरोजिनी नायडूंना 2 मार्च 1949 ला कार्यालयात काम करत असतांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला.
अश्या तऱ्हेने आपलं संपुर्ण आयुष्य सरोजिनींनी देशाला समर्पित केलं. आपल्या जीवनात त्यांनी भरपुर ख्याती आणि सन्मान प्राप्त केला होता शिवाय त्या लोकांकरता प्रेरणास्त्रोत देखील ठरल्या.
13 फेब्रुवारी 1964 ला भारत सरकारनं त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या सन्मानार्थ 15 पैश्यांचे डाकतिकीट प्रकाशित केले होते.
✍ *सरोजिनी नायडूंचे साहित्यातील योगदान*
सरोजिनी नायडूंनी केवळ एक महान क्रांतिकारी आणि चांगल्या राजनितीज्ञ म्हणुनच ख्याती प्राप्त केली नाही तर त्या एक चांगल्या कवियित्री म्हणुन देखील प्रसिध्द होत्या. आपल्या कवितांमधुन लोकांमध्ये क्रांतिकारी विचारांचे बीज तर पेरलेच शिवाय भारतिय संस्कृतीची देखील अद्भुत अशी व्याख्या केली. बालकांच्या साहित्याचे त्यांनी विपुल लेखन केले आणि त्याकरता देखील त्या प्रसिध्द झाल्या.
ईतकेच नव्हे तर त्यांच्या सुरेख कविता आणि गीतांमुळे त्यांना भारताची कोकिळा (भारताची नाइटिंगल) म्हणुन सन्मानित करण्यात आले होते. 1905 ला त्यांच्या कवितांचा संग्रह “गोल्डन थ्रेसहोल्ड” नावाने प्रकाशित झाला त्यांनतर त्यांनी आपले अन्य दोन संग्रह “दी बर्ड ऑफ टाईम” आणि “दी ब्रोकन विंग्स” देखील प्रकाशित केले या कवितांना केवळ भारतातील लोकांनीच पसंती दिली असे नव्हें तर या पुस्तकांना इंग्लंड मधे देखील मोठया संख्येने वाचकांनी पसंत केले आणि या मुळेच त्यांना एक शक्तीशाली लेखीका म्हणुन ओळख मिळाली.
प्रख्यात कवियित्री सरोजिनींनी कवितां व्यतिरीक्त काही आर्टिकल आणि निबंधांचे सुध्दा लिखाण केले होते जसे “वर्ड्स ऑफ़ फ्रीडम” हे त्यांच्या राजनितीक विचारांवर आधारीत होते. या शिवाय त्यांनी महिला सशक्तिकरणासारख्या सामाजिक मुद्दयाला देखील आपल्या पुस्तकांच्या माध्यमातुन वाचा फोडली होती. समाजात या लिखाणाचा खोलवर परिणाम झाला.
द फेदर ऑफ द डॉन ला त्यांची कन्या पद्मजाने 1961 ला एडिट करून प्रकाशित केले होते. त्यांचे इतर साहित्य “दी बर्ड ऑफ़ टाइम: साँग ऑफ लाइफ, डेथ अँड दी स्प्रिंग, दी ब्रोकन विंग: साँग ऑफ़ लव्ह, डेथ अँड स्प्रिंग, मुहम्मद जिन्नाःअन एम्बेसिडर ऑफ़ यूनिटी, दी सेप्ट्रेड फ्लूट: साँग्स ऑफ़ इंडिया, अलाहाबाद: किताबिस्तान, दी इंडियन वीवर्स, फीस्ट ऑफ़ यूथ, दी मैजिक ट्री एंड दी विज़ार्ड मास्क देखील फार चर्चित आणि प्रसिध्द आहेत. या व्यतिरीक्त त्यांच्या काही कवितांमधील सुंदर आणि लयबध्द शब्दांमुळे त्या कवितांना गाता येणे सुध्दा शक्य आहे.
🔮 *सरोजिनी नायडूंविषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती*
वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी सरोजिनींनी 1200 ओळींचा ‘ए लेडी ऑफ लेक’ नावाचा खंडकाव्य लिहीला.
1918 ला त्यांनी मद्रास प्रांतिय संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.
1919 ला अखिल भारतीय होमरूल लीग प्रतिनीधी मंडळातील सदस्य या नात्याने त्या इंग्लंड दौऱ्यावर जाऊन आल्या.
1930 ला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले गुजरात येथे धारासना मधील ‘मिठाच्या सत्याग्रहाचे’ नेतृत्व सरोजिनी नायडूंनी मोठया धैर्याने केले.
1942 साली ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि जेल मध्ये गेल्या.
1947 ला दिल्लीत झालेल्या आशियाई परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले.
1947 साली स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या राज्यपाल म्हणुन त्यांची निवड झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏