मनाची शांतता आणि स्वास्थ टिकवण्यासाठी काय काय करता येऊ शकते? ऑफिसमधल्या कटकटी, घरातले वाद यांनी अगदी कंटाळा येतो? नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत चालू असते? कुणीच समजून घेत नाही? नुसत्या अपेक्षा केल्या जातात. वैतागले आहात? मनाला शांतता कशी लाभेल?
आपल्यापैकी अनेकांना ही समस्या भेडसावत असते. मन शांत नसतं. सतत कसलासा त्रास होत असतो. त्यामागे कारणं असंख्य असतात. काहीवेळा ती आपल्या आजुबाजूच्या वातावरणाशी संबंधीत असतात तर काही वेळा ती आपल्या अनुभव विश्वाशी जोडलेली असतात. ज्या गोष्टींचा मनावर थेट परिमाण होतो अशा गोष्टी, प्रसंग, टाळले पाहिजेत, किंवा त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. मुळात इतर माणसं कशी वागतील यावर आपला काहीच कंट्रोल नसतो अशावेळी इतरांच्या वागण्याचा किती त्रास करुन घ्यायचा याचाही विचार केला पाहिजे. .
अनेकदा अनेकांची आपल्याला मानसिक आणि भावनिक पातळीवर गरज असते.
तशीच इतरांनाही आपली गरज असू शकते. त्यामुळे गरज वाटेल तिथे मित्र-मैत्रिणींकडून किंवा कुटुंबियांकडून मानसिक , भावनिक मदत घ्या आणि ज्यांना कुणाला तुमची गरज असेल तिथे मदतीला उभे रहा. या दोन्ही प्रक्रिया मनाला आनंद आणि समाधान देऊन जातात.
आपले प्रश्न आणि आपल्या समस्या फक्त स्वत:पाशी ठेऊन सुटत नसतात. त्या नेहमी शेअर करायला पाहिजेत. शेअरींगमुळे मनावर ताण येत नाही. समस्येचे उत्तर शोधत असताना आपल्यापेक्षा निराळा विचार करणार कुणीतरी आपल्याबरोबर असेल तर समस्येकडे बघण्याचा निराळा दृष्टीकोन मिळू शकतो. समस्येचे उत्तरही सापडण्यासाठी मदत होऊ शकते. आपल्याला स्वत:च्या भावना समजल्या पाहिजेत. जर आपल्याला आपल्या भावना समजल्या तरच आपल्याला दुस-याच्या भावना समजून घेता येतील. भावना समजून घेता येणं आणि त्याचं व्यवस्थापन करता येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपलं स्वत:वर नियंत्रण तर राहतं. आनंदी राहणं तसं अवघड नसतं. लहान सहान प्रसंगांमध्येच खरंतर आनंद दडलेला असतो. पण ते क्षण आपण सोडून देतो आणि आनंद नाही म्हणून निराश होतो.
आनंद ही अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे मनाची कवाडं उघडी ठेऊन विचार केला तर आंनद आपल्या आजुबाजूच्या प्रत्येक गोष्टीत दडलेला आहे.
आता रहिता राहिला प्रश्न गृहीत धरले जाते या भावनेचा तर बऱ्याचदा आपणच कुटुंबियांमध्ये ही भावना निर्माण व्हायला कारणीभूत असतो. घरातल्या कुणाचच माझ्याशिवाय पान हलत नाही ही भावना अनेकांना सुखावून जाते. ही भावना सतत मिळवण्यासाठी अनेक जण कुटुंबाच्या अवतीभोवती सतत घुटमळत असतात. पण एका टप्प्यानंतर होतं काय की कुटुंबाला या गोष्टीच कौतुक राहत नाही आणि माणसं एकमेकांना गृहीत धरायला सुरुवात करतात. यासाठी कुटुंब आहेच पण पहिल्यापासून स्वतःसाठी वेळ काढण्याची सवय हवी. फार काही नाही तर रोज सकाळी चालायला जा. त्या निमित्ताने व्यायाम होईल, सकाळच्या प्रसन्न हवेने मनालाही आनंद मिळेल आणि स्पेस मिळेल. स्वतःसाठी वेळ मिळेल. आणि तगमग आपोआप कमी होत जाईल.
खरंतर उत्तरही आपल्यापाशीच असतात, पण प्रश्नांमध्येच आपण इतके गुंततो की उत्तरं दिसतंच नाहीत
सौजन्य मुक्ता चैतन्य
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏