भारतीय अणुसंशोधन कार्यक्रमाचे जनक
होमी जहांगीर भाभा (१९०९-१९६६)
आधुनिक काळात अणुसंशोधनाची गरज ओळखून डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी भारतात अणुसंशोधन केंद्राचा पाया घातला. 'शांततेसाठी अणू' या संकल्पनेचा पुरस्कार करून त्यांनी त्या आधारे 'भारताचं अणुधोरण तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वैयक्तिकरीत्या संशोधन करण्याऐवजी देशहितार्थ अशा संशोधनासाठी त्यांनी अन्य शास्त्रज्ञांनाही उद्युक्त केलं. विसाव्या शतकाअखेर अणुक्षेत्रात भारताला समर्थ करण्याचं मूलभूत श्रेय भाभांना जातं.
होमी भाभांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबईत झाला. प्राथमिक शिक्षण मुंबईत घेऊन १९२६ साली ते केंब्रिजला गेले. त्यांनी तिथे अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्यात शिष्यवृत्ती मिळवली. इतकंच नव्हे, तर केंब्रिज विद्यापीठाने त्यांना 'हॉपकिन्स' पारितोषिक दिलं, तर इ.स. १९३४ चं 'अॅडम्स पारितोषिक' ही त्यांना मिळालं. विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन व पॉल दिराक या दोघांचा भाभांवर मोठा प्रभाव होता. वास्तवशास्त्रातील 'नोबेल' पारितोषिक विजेत्या पॉल दिराक यांच्या हाताखाली त्यांनी काही काळ संशोधनही केलं. याच सुमारास 'कॉस्मिक रेज' (विश्वकिरण) या विषयावरील प्रा. आर्थर कॉप्टन यांच्या व्याख्यानामुळे प्रभावित होऊन भाभांनी आपल्या डॉक्टरेटनंतरच्या संशोधनासाठी 'विश्वकिरण' हाच विषय घेतला. हे संशोधन त्यांनी डॉ. हायटलर यांच्यासोबत केलं. 'भाभा हायटलर सिद्धांत' म्हणून ते प्रसिद्ध आहे.
१९४० मध्ये भारतात परतल्यानंतर डॉ. भाभांनी डॉ. चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्यासोबत भौतिकशास्त्रात संशोधन सुरू केलं. या संशोधनांवरील त्यांचे अनेक शोधनिबंध सर्वदूर गाजले. याच सुमारास भाभांनी अणुविज्ञान संशोधनाचं महत्त्व ओळखून पाश्चात्त्य देशांच्या धर्तीवर भविष्याकडे लक्ष ठेवून भारतातही मूलभूत संशोधन संस्था सुरू करायला हवी, असं मत टाटा उद्योगसमूहाकडे व्यक्त केलं. तेव्हा टाटांनी भाभांवरच ही संस्था सुरू करण्याची जबाबदारी टाकली व १९४५ साली 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' ही संशोधन संस्था उदयास आली. याच काळात भारताने अणुसंशोधनाचा आरंभ करावा असं भाभांना वाटलं व भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भाभांनी अणुसंशोधनाची उपयुक्तता पटवून दिली.
१९४८ मध्ये भारत सरकारने तुर्भे इथे अणुसंशोधन संस्थेची स्थापना केली. 'शांततेसाठी अणू' या योजनेचा पाया डॉ. भाभांनी घातला. अणू आणि किरणोत्सर्गी समस्थली यांच्या विविध क्षेत्रांतील उपयोगांसंबंधीचं संशोधन सुरू केलं. भाभांनी भारतात अणुऊर्जाविषयक कार्यक्रम रुजवला, विकसित केला. त्यांना भारताच्या 'अणुधोरणाचे शिल्पकार' म्हटलं जातं ते यामुळेच. १९४८ मध्ये भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याचं अध्यक्षपद डॉ. भाभांकडेच सोपवण्यात आलं होतं. १९५४ ला सुरू झालेल्या अणुऊर्जा खात्याचे ते पहिले सचिव बनले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच १९५६ मध्ये 'अप्सरा' या अणुभट्टीची उभारणी झाली. अणूचा शांततेसाठी उपयोग करण्याच्या धोरणासंबंधी चर्चा करण्यासाठी १९५५ मध्ये संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे ते अध्यक्ष होते. होमी भाभा यांनी पंतप्रधानांचे विज्ञान व तंत्रज्ञानविषयक सल्लागार म्हणूनही मोठी कामगिरी बजावली. 'भारतीय अवकाश संशोधन संस्था' (इस्त्रो) आणि 'भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आयोग' सुरू होण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते. डॉ. भाभा यांनी केलेल्या या अविरत प्रयत्नांचं फळ म्हणजे अल्पावधीत भारताला अणुक्षेत्रात लाभलेलं यश. जगातील मोजक्या अणुऊर्जा संशोधन प्रकल्पात भारतातील अणुभट्ट्या गणल्या जातात. केवळ विज्ञान पारंगतता एवढंच नव्हे, तर डॉ. भाभा यांच्या व्यक्तिमत्त्वाला चित्रकार, संगीत रसिक, वृक्षप्रेमी असे अनेक पैलूही होते. २४ जानेवारी १९६६ ला झालेल्या एका विमान अपघातात हा महान वैज्ञानिक मृत्युमुखी पडला. मात्र त्यांनी आधुनिक भारतातील विज्ञानाला विशेषतः अणुविज्ञानाला दिलेली दिशा त्यांचं नाव अजरामर करून गेले....
🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏