परिपूर्ण कोणी नसतं
मित्रांनो, प्रत्येक माणूस हा आपापल्या क्षेत्रात पारंगत असतो. एखादा उत्तम वक्ता असेल तर त्याला आपल्या कार्यक्रमाचे उत्तम मार्केटिंग करता येईल असे नव्हे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यक्रम यशस्वी करायचे असतील तर त्या व्यक्तीने मार्केटिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसाशी पार्टनरशिप करणे आवश्यक असते. तर ती ट्रेनिंग कंपनी पुढे जाऊ शकते. वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्याला वेगवेगळे करार करावे लागतात. सल्ला घ्यावा लागतो. हे एक साहचर्य आहे. एक आंधळा व एक लंगडा भिकारी एका गावात एकत्र भेटतात. गप्पा मारू लागतात. आंधळ्याला नीट दिसत नसते. त्यामुळे त्याला रस्ता पार करता येत नाही. काही लबाड लोकही त्याला काही वेळेला कमी पैसे टाकून जास्त पैसे घेऊन त्याला फसवतात. लंगड्या माणसाला चालता येत नाही. थोडं चाललं की, त्याला खूप त्रास होतो. मग हे दोघेही एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तयार होतात, आणि लंगडा भिकारी आंधळ्याच्या खांद्यावर बसतो. दमल्यानंतर दोघेही एका झाडाखाली बसतात. आणि मिळालेले पैसे दोघेही वाटून घेतात. दोघे एकमेकांनो खूप मदत करतात. त्यांनी एकमेकांना एकमेकांच्या शक्ती दिल्या. त्यामुळे त्यांचे आयुष्य खूप छान चाललेले आहे. मित्रांनो, या जगात कोणीच परिपूर्ण नसतो. जे आपल्याकडे नाही, त्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यायची असते. जे आपल्याकडे आहे व दुसऱ्याकडे नाही त्याला आपण मदत करायची.
- डॉ. दत्ता कोहिनकर (माईंड पॉवर ट्रेनर