सर्वच धर्मांत क्षमेला महत्त्वाचे स्थान आहे. खरा धर्म सुधारणावादी असतो. म्हणून गुन्हेगाराला शिक्षा देण्याऐवजी सुधारण्याची संधी देण्यात धर्माला जास्त रस असतो. माणूस चुकणार, चुकत शिकणार आणि सुधारत जाणार या विचारावर क्षमेचे तत्त्वज्ञान अवलंबून आहे. इंग्रजीत म्हण आहे, 'टू एर इज ह्युमन, टू फरगिव्ह, डिव्हाइन.' खरेतर क्षमा करणे माणसाचा गुणधर्म आहे. या म्हणीत अभिप्रेत असलेली गोष्ट म्हणजे चूक सुधारणे माणसाचे कर्तव्य होय.
संत तुकाराम म्हणतात, 'दया क्षमा शांती। तेथे देवाची वसती.' दयावान क्षमाकर्ता क्षोभ दूर करून शांती निर्माण करणारा देवमाणूसच असतो.
क्षमायाचक क्षमाकर्त्याइतकाच उदार व दिलदार असावा लागतो. क्षमेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी दोघांवरही असते. क्षमा केल्याचे क्षमाकर्त्याने लगेच विसरावे व क्षमाप्राप्तकर्त्याने सुधारणेला सुरुवात करावी. म्हणूनच म्हटले जाते, 'फरगिव्ह अँड फर्गेट.'
महात्मा गांधीजींनी सत्य-अहिंसा-क्षमा या तत्त्वज्ञानाला मोठ्या नैतिक उंचीवर नेले. चुकणाऱ्या व्यक्तीला त्यांनी माफ केले
पण व्यवस्थेविरुद्ध सत्याग्रही संघर्ष केला. त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या पोलिसांना व अधिकाऱ्यांना त्यांनी क्षमा केली. ज्यांनी चुका आणि गुन्हे केले त्यांचे नावही आज घेतले जात नाही; पण क्षमा करणाऱ्या गांधीजींना जगाने गौतम बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त, बसवेश्वर, आदींच्या मालिकेत बसविले. ज्यांनी सुळावर चढवले, त्यांच्याबद्दल कोणताही राग न बाळगता येशूने त्यांना क्षमा केली.
एवढी न्यायालये व देवालये असूनही सर्वत्र गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. कित्येकदा गुन्हा चुकून घडतो, कित्येकदा तो मुद्दाम होतो. काहींना केलेल्या गुन्ह्याबद्दल काहीच वाटत नाही, तर काहींना गुन्ह्याबद्दल पश्चात्ताप होतो. पश्चात्तापाला 'कॅथार्सिक इफेक्ट' असतो. म्हणून पश्चात्ताप ही पापक्षालनाची पहिली पायरी. एखाद्या खुन्यामध्ये राग व सूडाची भावना इतकी टोकाला जाते की, खून करताना तो जणू पशू बनतो; पण खून केल्यानंतर सैरावैरा धावू लागतो, स्वत:ला लपवतो. एखाद्याचं रक्त त्यानं सांडलेलं असतं. आता त्याचं रक्तच त्याला सोडत नाही. त्याच्या देहाच्या किनाऱ्यावर ते उसळू लागतं आणि गुन्ह्याची कबुली द्यायला भाग पाडतं.
कोणत्याही वैद्यकीय किंवा न्यायालयीन उपायांनी जे साध्य होणार नाही ते पश्चात्तापाने साध्य होतं.
दुष्टों का बल हिंसा है, राजाओ का बल दंड है और गुणवानों का क्षमा है। -- महाभारत
क्षमा बलमशक्तानाम् शक्तानाम् भूषणम् क्षमा।
क्षमा वशीकृते लोके क्षमयाः किम् न सिद्ध्यति॥
क्षमा निर्बलों का बल है, क्षमा बलवानों का आभूषण है, क्षमा ने इस विश्व को वश में किया हुआ है, क्षमा से कौन सा कार्य सिद्ध नहीं हो सकता है?
क्षमा वीरस्य भूषणम् ...क्षमा वीरों का आभूषण है
'बायबल'मध्ये एक बोधकथा आहे. एक माणूस असतो. त्याला दोन मुले. त्याचे थोडेफार शेत असते. शेतात काही काम असते. तो पहिल्या मुलाला ते काम करण्याविषयी सांगतो. 'मी हे काम करणार नाही' असे तो म्हणतो; पण नंतर त्याला पश्चात्ताप होतो आणि ते काम तो करतो. तो माणूस आपल्या दुसऱ्या मुलालाही ते काम करण्यासाठी आज्ञा करतो. 'हे काम मी करेन' असे तो म्हणतो आणि प्रत्यक्षात शेताकडे फिरकतही नाही. येथे पहिल्या मुलाने शाब्दिक नकार देऊन वडिलांचा आज्ञाभंग केलेला आहे; पण प्रत्यक्षात सकारात्मक कृती केली आहे. दुसऱ्याने शाब्दिक होकार देऊन आज्ञापालन केले; पण प्रत्यक्षात सकारात्मक कृतीच केलेली नाही. म्हणून कोणता मुलगा बरोबर हे ठरवणे अवघड होते. येशू ख्रिस्तांच्या मते, पहिला मुलगा बरोबर आहे. कारण त्याने नकार दिला असला तरी पश्चात्ताप झाल्याने नंतर त्याने योग्य ती कृती केलेली आहे. माणसाच्या नैतिक आणि मानसिक विकासात क्षमा आणि पश्चात्ताप यांना महत्त्वाचे स्थान असते. क्षमा म्हणजे चूक किंवा गुन्ह्यावर पडदा टाकणे होय, तर पश्चात्ताप म्हणजे चूक किंवा गुन्ह्यावरील पडदा उघडणे होय!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏