आज १५ सप्टेंबर
आज ओझोन डे
जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर) ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏