*जगातील प्रश्न युद्धाने नव्हे,तर बुद्धाने सुटतील!*
*-- डॉ.श्रीमंत कोकाटे*
तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ईसपू. 563 साली लुम्बिनी या ठिकाणी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुध्दोदन तर आईचे नाव महामाया होते.मातेचे सातव्या दिवशी निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ मावशी तथा सावत्र माता गौतमीने अत्यंत प्रेमाने केला.बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते. *अशक्य कार्य सिद्धीस नेणारा म्हणजे सिद्धार्थ होय*. कारुण्य आणि प्रेम यांनी त्यांचे व्यक्तिमत्व ओतप्रोत भरले होते.
सिद्धार्थला सर्व प्रकारचे शिक्षण देण्यात आले. त्यांचा विवाह यशोधरेबरोबर झाला.त्यांना राहुल नावाचा मुलगा होता.सिद्धार्थ राजपुत्र होते.ऐश्वर्य त्यांच्या पायात लोळत होते.परंतु मानवी समुदयात असणाऱ्या दुःखाने ते अस्वस्थ होते.दुःख नष्ट होऊन सर्वांना सुख मिळावे, या उदात्त हेतूने त्यांनी गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला.
ऐन तारुण्यात म्हणजे तिशीत असताना त्यांनी सुंदर राजवाडा,सुंदर महाराणी,सुंदर पुत्र आणि आनंददायी जीवनाचा त्याग केला.ते कपिलवस्तूवरून राजगृह आणि नंतर गया येथे आले.तेथे ज्ञानार्जन केले.कठोर कष्ट घेतले.वेद, उपनिषद वाचली.त्यातील निरर्थकता त्यांनी ओळखली.त्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले.ते आता बुद्ध झाले.पण ते एकांतात थांबले नाहीत.ते लोकांत जाऊन बोध करू लागले.
सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी पहिले प्रवचन वाराणशी जवळील सारनाथ येथे केले. बुद्धाने सांगितलेले तत्वज्ञान पुढीलप्रमाणे आहे.
*"जीवन हे दुःखमय आहे,त्यामागे तृष्णा आहे,पण दुःखाचे निराकरण होऊ शकते,तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे."* पूर्वजन्म- पुनर्जन्म, कर्मविपाक या अज्ञानी बाबी नाकारून त्यांनी मानवाला आत्मविश्वास दिला.अत्यंत साध्या सोप्या लोकभाषेत म्हणजे पाली भाषेत त्यांनी बोध केला.त्यांनी वेदप्रामाण्य नाकारले. त्यांनी ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग करून लोककल्ल्याणासाठी आयुष्याची अखंड 50 वर्षे गावोगावी परिभ्रमण केले.त्यांच्या विचाराने जनसमुदाय प्रभावित झाला.अनेक राजानी बुद्धांचा विचार अंगिकारला.
बुद्ध म्हणाले *"मी देव नाही किंवा त्याचा दूत नाही.ईश्वर आहे की नाही त्यापेक्षा माणूस आहे आणि त्याचे प्रश्न महत्वाचे आहेत,आणि ते सोडवण्याचा मार्ग आहे, तो मार्ग म्हणजेच अरिय सत्ये-अष्टांगिक मार्ग होय.दुःखी जीवनाला चमत्काराने किंवा कर्मकांडाने नव्हे, तर प्रयत्नाने सुखी बनवता येते"* हा प्रयत्नवाद बुद्ध सांगतात.
बुद्ध म्हणाले *"जिवंत माणसांचा विचार करा,स्वर्ग,नरक,पूर्वजन्म,पुनर्जन्म,आत्मा या थोतांडात अडकू नका.बुद्ध प्रतित्यसमुत्पाद सांगतात, म्हणजे सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या मागे कारण आहे, चमत्कार नाही,"* निसर्गात घडणाऱ्या घटनांचे शास्त्रीय विश्लेषण करणारा जगातील पहिला महामानव म्हणजे बुद्ध होय.जगातील विज्ञानाचा पाया बुद्धाने घातला.यज्ञ-होम हवनाने फलप्राप्ती होते,असे सांगणे म्हणजे एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवल्यासारखे आहे.असे बुद्ध म्हणतात.बुद्धांच्या विचारांमुळे जुलमी,शोषण करणारी यज्ञ संस्कृती खिळखिळी झाली.
कन्या जन्माने निराश झालेल्या राजा प्रसेनजीतला बुद्ध म्हणाले *"राजा मुलगी झाली दुःख करू नकोस,मुलगी सुद्धा शारीरिकदृष्ट्या,मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सामार्थ्यशाली आहे.मुलाप्रमाणेच मुलगी देखील वंशवर्धक आहे"*. अडीच हजार वर्षांपूर्वी मुलींना वंशाचा दिवा मानून त्यांना स्वातंत्र्य देणारे बुद्ध होते.ज्या काळात मुलगाच जन्माला(पुत्रकामेष्टी) आला पाहिजे, असे वैदिक(ब्राम्हणी) परंपरा सांगत होती.त्या काळात बुद्ध मुलगी देखील मुलाप्रमाणेच वंशाचा दिवा आहे, असे आग्रहाने सांगत होते.त्यांनी स्त्री-पुरुष भेदभाव नाकारला. आनंदशी झालेल्या विचारमंथनातून त्यांनी महिलांना संघगनात प्रवेश दिला.त्यांना ज्ञानार्जनाचा अधिकार दिला.
बुद्ध म्हणाले *"प्राण्यात जाती आहेत (हत्ती,घोडा,बैल इ), पक्षात जाती आहेत.(चिमणी,पोपट,कावळा इ),वनस्पतीमध्ये जाती आहेत (आंबा,चिंच,नारळ इ) तशा माणसात जाती दाखवा?"*.म्हणजे मानव हीच एक जात आहे.त्यामुळे माणसांनी माणसांशी विवाह करणे, हा आंतरजातीय विवाह नव्हे,तर तो एकजातीय विवाह ठरतो.मानवाने जर इतर प्राण्यांशी ( वाघ,हत्ती,घोडा,गाढव,कुत्रा इत्यादी) विवाह केला, तर तो आंतरजातीय विवाह ठरेल.सर्व माणसं समान आहेत.सर्वांचे रक्त लाल आहे,सर्वाना सारखेच अवयव आहेत,सर्वाना श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो,त्यामुळे भेदाभेद पाळणे अधर्म आहे, तर समता पाळणे धर्म आहे.
बुद्ध म्हणाले *" माझ्या कालबाह्य नव्हे तर कालातीत ज्ञानाचे अनुयायी व्हा"* बुद्धाचे विचार कालबाह्य झाले नाहीत, तरी देखील माझे विचार कालबाह्य वाटले, तर त्याचा त्याग करा, असे सांगायला आत्मविश्वास, हिम्मत आणि प्रामाणिकपणा लागतो, तो बुद्धाकडे प्रचंड होता,त्यामुळेच नवीन तत्वज्ञानाची मांडणी करणारे अश्वघोष,नागसेन,वसुबंधु,दिग्नाग,धर्मकिर्ती,विवेकानंद,ओशो,डॉ.आंबेडकर,शरद पाटील असे महान फिलॉसॉफर निर्माण झाले.
बुद्ध म्हणाले *अत्त दीप भव* म्हणजे स्वयंप्रज्ञ व्हा, स्वतः ज्ञानी व्हा आणि स्वतः ज्ञानी झालेल्या व्यक्तीला जगात कोणीही फसवू शकत नाही. आज जगात धर्माच्या नावाखाली गुलामगिरी आलेली आहे. शोषणव्यवस्था आलेली आहे. त्याला सर्वसामान्यांचे अज्ञानच कारणीभूत आहे. त्यामुळेच अनेक बुवा, बापू ,आचार्य, शंकराचार्य, भोंदू बाबा, सर्वसामान्य लोकांनाच काय शिक्षित लोकांना देखील फसवत असतात. त्याचे कारण योग्य ज्ञानाची प्राप्ती न केल्यामुळे! त्यामुळे बुद्ध कालामाना म्हणाले *"एखादा विद्वान, सुंदर, भाषाप्रभू व्यक्ती सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका, तर सत्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या विचारावर विश्वास ठेवा आणि त्यासाठी तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा'* म्हणजेच बुद्धाने धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजेच *अत्त दीप भव* हा सिद्धांत सांगितला.
बुद्धाच्या मतानुसार ब्रह्मचर्य ही संकल्पना नैसर्गिक नसून अनैसर्गिक आहे, किंबहुना निसर्गविरोधी आहे.परंतु त्यावरती नैसर्गिकरित्या अंकुश ठेवता येतो, असेही बुद्ध म्हणतात. ब्रह्मचर्याच्या नावाखाली दमन करणे, ही संस्कृती नसून ही विकृती आहे. प्रजनन हा सजीवांचा स्थायीभाव आहे.तो सृजनाशी संबंधित आहे. बुद्धाचा धम्म हा निसर्गवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आहे, त्यात विकृतीला थारा नाही.
तथागत गौतम बुद्ध हे समता,बुद्धिप्रामाण्यवाद,महिलांचे स्वातंत्र्य सन्मान,अहिंसा,सत्य,अस्तेय,असंग्रह,नैतिकता सांगतात. हिंसेने प्रश्न सुटत नसतात, तर वाढत असतात.सत्याने वागले तर मनस्ताप होत नाही.गरजेपेक्षा जास्त धनसंचय झाला तर प्रबोधनाऐवजी संपत्ती वाचविण्यासाठी शत्रूला शरण जावे लागते.त्यामुळे अतिरिक्त अनाधिकृत संपत्ती शरणांगत बनविते.क्रान्तीला अडथळा ठरते.त्यामुळे या नितीमूल्यांचे पालन करण्याचा आग्रह बुद्ध धरतात.
गौतम बुद्धांच्या विचाराने सम्राट अशोक प्रभावित झाले,त्यांनी लोककल्याणकारी राज्यकारभार केला.बुद्धाचा विचार जगभर गेला.आज जगातील सुमारे 220 कोटी लोक बौद्ध आहेत.बुद्धाला जगातील सर्वोत्कृष्ट महामानव मानले जाते. अनेक राष्ट्रांचा तो जीवनमार्ग झाला आहे.पण सनातन्यांनी ईश्वर,नामस्मरण,संस्कृती, पाप-पुण्य, देव,धर्म,कर्मकांड,यज्ञ,पूर्वजन्म- पुनर्जन्म इत्यादी बाबी आणून भारतातून बुद्धांचा विचार हद्दपार केला,परंतु विविध मार्गाने तो आजही जनमानसात टिकून आहे.संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज,म.फुले यांनी गौतम बुद्धांचा मुक्तकंठाने गौरव केलेला आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1910 साली बडोद्यात बुद्धांचा पुतळा उभारून त्यांच्या विचारांचे जागरण केले. कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी पहिले बुद्ध चरित्र लिहिले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध विचार भारतात अजरामर केला.विवेकानंद आणि ओशो यांच्या जीवनावर बुद्धांचा प्रभाव होता.प्राच्यविध्यापंडित शरद पाटील यांनी क्रातीकारक बुद्ध चरित्र मांडले.
आज जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे.असूया,अहंकार,द्वेष,हिंसा, टोळी युद्ध,शीतयुद्ध,भ्रष्टचार, महासत्तेसाठी जीवघेणी स्पर्धा, व्यसनाधीनता,राग, संपत्तीची लालसा यामुळे मानव क्रूर बनत चालला आहे.त्यासाठी सतत युद्धाची भाषा बोलत आहे. हिंसक चित्रपट व त्याद्वारे पेरली जाणारी हिंसा,तिच्या पूर्तीसाठी भांडवली राष्ट्राची शस्त्रास्त्र उत्पादने युद्धसज्ज राष्ट्रांना विकत घ्यायला भाग पाडणे हे क्रूर राजकारण वाढत आहे. एवढे मात्र निश्चित की मानवी समूहाचा प्रश्न शस्त्राने-युद्धाने नव्हे, तर बुद्धानेच सुटणार आहे.जगाला शांतीचा,समतेचा, ज्ञानाचा,अहिंसेचा संदेश देणाऱ्या महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र वंदन आणि सर्वाना शुभेच्छा!
- *--डॉ.श्रीमंत कोकाटे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏