नक्की वाचा
अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला, रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रुग्णालयाचे मालक असलेल्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर, लगेचच ते स्वत: आय.सी.यू. मध्ये त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी गेले. दोन-तीन तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी कर्मचार्यांना सांगितले की, “या रुग्णाला कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची व्यवस्थित काळजी घ्यावी." तसेच त्याच्याकडून उपचाराचे व औषधाचे सुद्धा पैसे घेऊ नयेत, अशा ही सूचना त्यांनी दिल्या.
सुमारे 15 दिवस तो रुग्ण त्या हॉस्पिटलमध्ये होता. जेव्हां तो बरा झाला आणि त्याला हॉस्पिटलमधून सोडण्याचा दिवस आला, तेव्हां त्या पेशंटचे सर्व रिपोर्ट्स व सुमारे अडीच लाख रुपयांचे बिल त्या डॉक्टरांना देण्यात आले जे त्या हाॅस्पिटलचे मालक होते.
डॉक्टरांनी हिशोब ठेवणार्या साहेबांना बोलावून सांगितलं.. "या व्यक्तीकडून एक ही पैसा घेऊ नका. आणि असं करा, तुम्ही त्या रुग्णाला माझ्या खोलीत घेऊन या." त्या माणसाला व्हील चेयरवर डॉक्टरांच्या खोलीत नेण्यात आले.
डॉक्टरांनी पेशंटला विचारले- "भाऊ! आपण मला ओळखलंत का?" पेशंट म्हणाला, "मला असं वाटतं मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. पण आठवत नाही!"
डॉक्टर म्हणाले... "तुम्हाला आठवतं का, की चार वर्षांपूर्वी तुम्ही सूर्यास्ताच्या सुमारास, शहरापासून दूर अशा एका जंगलात एक गाडी दुरुस्त केली होतीत? त्या दिवशी मी माझ्या कुटुंबासोबत सहली वरुन परतत असताना, अचानकपणे गाडीतून धूर येऊ लागला आणि गाडी बंद पडली. आम्ही गाडी बाजूला घेवून, ती सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी सुरू झाली नाही. हळू हळू अंधार होऊ लागला होता. आजूबाजूला निर्जन जंगल होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहर्यावर भिती आणि काळजीच्या रेषा उमटल्या होत्या. प्रत्येकजण देवाकडे, काहीतरी मदत मिळावी, यासाठी प्रार्थना करत होते.
काही वेळातच चमत्कार घडला. तुम्ही बाईकवरून येताना आम्हांला दिसलात. आम्ही सर्वांनी, दयेच्या भावनेने हात वर केले आणि तुम्हाला थांबण्याचा इशारा केला. तुम्ही बाईक उभी केलीत व आमच्या त्रासाचे कारण विचारलेत. गाडीचे बोनेट उघडून तुम्ही काही तपासणी केलीत आणि काही क्षणातच गाडी सुरू झाली. आमच्या सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि आमच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली. आम्हाला वाटले, की देवानीच तुम्हाला आमच्या मदतीसाठी पाठविले असावे, कारण त्या निर्जन जंगलात रात्र घालवावी लागणार, ह्या विचारानेच आमच्या अंगावर भितीने शहारे येत होते. तेव्हा तुम्ही मला सांगितले होते, की तुम्ही एक गॅरेज चालवता. मी तुमचे आभार मानले आणि म्हणालो, की पैसे असूनही अशा कठीण प्रसंगी मदत मिळत नाही. अशा कठीण परिस्थितीत तुम्ही आम्हाला केलेल्या मदतीला तोड नाही, ती अमूल्य आहे. पण तरीही मी तुम्हाला विचारतो की ”मी तुम्हाला किती पैसे देऊ?”
त्यावेळी तुम्ही माझ्यासमोर हात जोडून जे शब्द उच्चारलेत, ते शब्द माझ्या आयुष्याची प्रेरणा बनले आहेत. तुम्ही म्हणालात की, *"माझा नियम आणि तत्व हे आहे, की मी संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीच्या बदल्यात कधीही काहीही घेत नाही. माझा देव माझ्या ह्या कर्माचा हिशोब ठेवत आहे."* त्या दिवशी मला जाणवले, की आर्थिक परिस्थिती सामान्य असलेली व्यक्ती, जर असे उच्च विचार आणि अशा मूल्यांचे दृढनिश्चयाने अनुसरण करू शकते, तर मी का नाही? आणि ह्याच संकल्पाचा मी ही माझ्या आयुष्यात पाठपुरावा करत आहे. चार वर्ष झाली आहेत, माझ्या अपेक्षेपेक्षाही मला जास्त मिळत आहे आणि कधीच काहीही कमी पडलेले नाही.
हे रुग्णालय माझे आहे. तुम्ही येथे माझे पाहुणे आहात आणि तुमच्या नियमानुसार मी तुमच्याकडून काहीही घेऊ शकत नाही.”
अशा प्रेरणादायी व्यक्तीची सेवा करण्याची संधी मला मिळाली, ही देवाचीच कृपा आहे. तुमच्या देवाने तुमच्या चांगल्या कर्मांचा हिशोब ठेवला आणि आज तो हिशेब चुकता झाला. माझा देव ही माझ्या कर्मांचा हिशोब ठेवेल आणि जेव्हा जेव्हा मला त्याची आवश्यकता असेल, तेव्हा त्याची परतफेड त्यातूनच होईल.” डॉक्टर त्या रुग्णाला म्हणाले.
"तुम्ही निर्धास्त मनाने घरी जा आणि जेव्हा कधी अडचण आली, तर तेव्हा तुम्ही संकोच न बाळगता माझ्याकडे येऊ शकता." त्या खोलीमधून बाहेर पडताना, त्या व्यक्तीने खोलीत ठेवलेल्या परमेश्वराच्या फोटो समोर हात जोडले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व हृदय प्रेमाने भरून आले.
आपण केलेली कर्मे आपल्याकडे परत येतात आणि ती ही व्याजासह. हाच सृष्टीचा नियम आहे
*"जगातील लोकांची नि:स्वार्थपणे सेवा करणे, हा त्यागाचा आणि उपासनेचा सर्वोत्तम मार्ग आहे. जो असे करतो तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो."
लेख आवडला तर शेअर करा🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏